
हिंदुस्थानातील शीख भाविकांना करतारपूरला जाण्यासाठी पासपोर्ट अनिवार्य असणार आहे. पाकिस्तानी सैन्याचे प्रवक्ते मेजर जनरल आसिफ गफूर यांनी पाकिस्तानात प्रवेश करण्यासाठी पासपोर्ट आवश्यक असल्याचे गुरुवारी स्पष्ट केले.
हिंदुस्थानने बुधवारी पाकिस्तानला शीख भाविकांच्या पासपोर्टविषयी असलेले धोरण स्पष्ट करण्यास सांगितले होते. त्यानुसार आता पाकिस्तान सैन्याने पंतप्रधान इम्रान खान यांचा पासपोर्ट आवश्यक नसल्याचा निर्णयच फेटाळून लावला. 1 नोव्हेंबरला इम्रान खान यांनी केवळ ओळखपत्राच्या आधारे हिंदुस्थानी भाविकांना करतारपूर यात्रेसाठी पाकिस्तानात प्रवेश देणार असल्याचे म्हटले होते. पण अवघ्या आठवडाभरातच पाकिस्तानने पंतप्रधानांच्या या निर्णयावर पलटी मारली.
उद्घाटनादिवशी विनामूल्य दर्शन
हिंदुस्थानी सीमेपासून करतारपूरमधील गुरुद्वारा दरबार साहिबपर्यंत तर हिंदुस्थानातील गुरुदासपूरमधील डेरा बाबा नानकपासून सीमेपर्यंत कॉरिडॉर बांधण्यात आला आहे. गुरुनानक यांच्या 550 व्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर येत्या 9 नोव्हेंबरला या कॉरिडॉरचे उद्घाटन होणार आहे. यादिवाशी हिंदुस्थानी भाविकांना विनामूल्य दर्शनाची सोय उपलब्ध करून देणार असल्याचे इम्रान खान यांनी या आधीच जाहीर केले आहे.
सर्वकाही सामंजस्य करारानुसार
करतारपूर साहिबला भेट देणाऱया हिंदुस्थानी भाविकांना पासपोर्ट अनिवार्य आहे की नाही याविषयी पाकिस्तानकडून येणाऱया विरोधाभासी वक्तव्यामुळे परराष्ट्र मंत्रालयाने नाराजी व्यक्त केली आहे. त्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव रवीश कुमार यांनी स्पष्ट केले की दोन्ही देशांमध्ये करतारपूर यात्रेसाठी जो सामंजस्य करार झाला आहे त्यानुसार भाविकांजवळ पासपोर्ट असणे आवश्यक आहे.
पंतप्रधान इम्रान खान यांनी करतारपूरला येणाऱया हिंदुस्थानी भाविकांना पासपोर्टशिवायच पाकिस्तानात प्रवेश देणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र पाकिस्तानी सैन्य दलाचे प्रवक्ते मेजर जनरल आसिफ गफूर यांनी सुरक्षेशी कोणतीही तडजोड करणार नाही. पाकिस्तानात प्रवेश करणाऱया सर्व भाविकांना पासपोर्ट अनिवार्य असेल, असे स्पष्ट केले.
करतारपूर कॉरिडोरमार्गे पाकिस्तानातील दरबार साहिब येथे दररोज 5 हजार शीख भाविकांना दर्शनासाठी सोडण्यात येणार आहे.
यासाठी भाविकांकडून 20 डॉलर्स (1420 रुपये) आकारण्यात येणार आहे.
यातून पाकिस्तानची दररोज सुमारे 1 लाख डॉलर्सची कमाई होणार आहे. याचा अर्थ एका वर्षात तीन कोटी 65 लाख डॉलर्सचे उत्पन्न पाकिस्तानला मिळणार आहे.
सिद्धू निघाले पाकिस्तानला
नानक साहिब गुरुद्वारामध्ये होणाऱया कार्यक्रमासाठी अखेर काँग्रेसचे खासदार नवज्योतसिंह सिद्धू यांना परवानगी मिळाली. त्यांनी हिंदुस्थानी परराष्ट्र खात्याबरोबर तीन वेळा पत्रव्यवहार केला. शेवटी सामान्य भाविकांप्रमाणे पाकिस्तानकडे व्हिसासाठी परवानगी मागू, असा इशारा दिल्यानंतर त्यांना परवानगी दिली.



























































