करतारपूर यात्रेवर दहशतवादाचे सावट, साहिब गुरुद्वाराच्या नारोवाल जिल्हय़ात अनेक अतिरेकी अड्डे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थान आणि पाकिस्तानदरम्यान करतारपूर कॉरिडोअर सुरू होण्यास काही दिवसच शिल्लक असताना सुरक्षा यंत्रणांनी सतर्कतेचा इशारा दिला आहे. सुरक्षा यंत्रणेला मिळालेल्या माहितीनुसार पवित्र साहिब गुरुद्वारा असलेल्या नारोवाल जिह्यात अनेक अतिरेकी अड्डे कार्यरत असल्याचे समोर आले आहे.

शीख बांधवांचे पहिले गुरू गुरुनानक यांचे पाकिस्तानमधील पवित्र स्थळ करतारपूर साहिब गुरुद्वाराला भेट देण्यासाठी करतारपूर कॉरिडोअर सुरू करण्यात आला आहे. 9 नोव्हेंबरपासून हा कॉरिडोअर हिंदुस्थानातील भाविकांसाठी सुरू करण्यात येणार आहे. दरदिवशी तब्बल पाच हजार भाविकांना दर्शन घेता येणार आहे, पण हा गुरुद्वारा असलेल्या नारोवाल जिह्यात दहशतवादी कारवाया होत असल्याचे समोर आल्याने केंद्र सरकार चिंतेत पडले आहे.

करतारपूर कॉरिडोअर हिंदुस्थानातील पंजाबमधील गुरुदासपूर जिह्यातील डेरा बाबक नानक साहिबपासून पाकिस्तानातील पंजाबमधील नारोवाल जिह्यातील करतारपूर साहिब गुरुद्वाराला जोडणार आहे.

दहशतवाद्यांचे अड्डे पाकिस्तानातील पंजाबमधील मुरिदके, शाकरगढ आणि नारोवाल जिह्यात आढळून आले आहेत. मोठय़ा संख्येत महिला आणि पुरुष दहशतवादी या अड्डय़ांवर प्रशिक्षण घेत आहेत.

देशविरोधी कारवाया वाढण्याची भीती

पंजाबमध्ये नुकतीच देशाच्या सीमाप्रश्नाविषयी बैठक पार पडली. या बैठकीत करतारपूर कॉरिडॉरच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला. पाकिस्तानद्वारे करतारपूर कॉरिडॉअर सुरू करण्याची घाई लक्षात घेता या माध्यमातून अमली पदार्थांची तस्करी आणि हिंदुस्थानविरोधी कारवाया घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. यात मोठय़ा प्रमाणावर पाकिस्तानमधील सीमकार्डस्चा वापर होऊ शकतो. त्यामुळे पंजाब पोलिसांना पाकिस्तानी सीमकार्डसवर बंदी घालण्याची मागणी होत आहे.