
सामना प्रतिनिधी । पंढरपूर
कार्तिकी वारीच्या काळात उपस्थित असलेल्या आठ लाख भाविकांनी श्री विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेतले. यावेळी भाविकांनी देवाच्या चरणी एक कोटी 98 लाख रुपयांचे दान अर्पण केल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी सचिन ढोले यांनी दिली.
गेल्या कार्तिकी वारीमध्ये समितीला एक कोटी 30 लाख 45 हजार 352 रुपये इतके उत्पन्न मिळाले होते. या वर्षी मंदिर समितीला 67 लाख 76 हजार 82 रुपये अधिकचे उत्पन्न मिळाले आहे. कार्तिक वारी काळात तीन लाखांहून अधिक भाविकांनी श्री विठ्ठलाचे मुखदर्शन तर पाच लाख सहा हजार 335 भाविकांनी पदस्पर्श दर्शनाचा लाभ घेतला.
देणगीचे स्वरूप
श्री विठ्ठलाच्या पायावर ओवाळणीच्या स्वरूपात 23 लाख 77 हजार 981 रुपये, श्री रुक्मिणीमातेच्या पायावर सात लाख 92 हजार 260, अन्नछत्र देणगी 61 हजार 650, पावती स्वरूपातील देणगी 88 लाख 69 हजार 186 रुपये, बुंदी लाडूप्रसाद विक्रीद्वारे 33 लाख 23 हजार 850 रुपये, राजगिरा लाडूविक्री तीन लाख 33 हजार 500, फोटो विक्रीद्वारे 66 हजार 650, मंदिर समितीच्या विविध भक्तनिवास देणगीद्वारे चार लाख 91 हजार 90, नित्यपूजा चार लाख, हुंडी पेटीत जमा 24 लाख 88 हजार 537, ऑनलाइन देणगी दोन लाख 71 हजार 730, तसेच अन्य स्वरूपात तीन लाख 45 हजार रुपये जमा झाले आहेत.




























































