प्रिय क्रिकेट, मला पुन्हा एक संधी दे! आघाडीचा फलंदाज करुण नायरची भावनिक खंत

‘प्रिय क्रिकेट, मला फक्त आणखी एक संधी दे’ या ओळींनी कसोटी संघात परतण्याची आस धरलेला करुण नायर पुन्हा एकदा हताश झाला आहे. वेस्ट इंडीजविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेसाठी जाहीर झालेल्या हिंदुस्थानच्या संघात त्याचे नाव नसल्याने हा अनुभवी फलंदाज भावनिक झाला. दीर्घ प्रतीक्षेनंतर कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन केलेल्या नायरला इंग्लंड दौऱ्यानंतर पुन्हा डावलण्यात आले आहे.

संघनिवडीत नाव नसल्यामुळे निराश झालेल्या नायरने सोशल मीडियावर आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. तो म्हणाला, ‘हा माझ्यासाठी धक्का आहे. माझ्याकडे शब्दच नाहीत. सांगण्यासाठी काही खास नाही. निवडकर्त्यांना विचारलं पाहिजे की त्यांच्या मनात नेमकं काय आहे.’ नायरच्या या शब्दांत त्याची हतबलता स्पष्ट दिसत होती.

वेस्ट इंडीजचा संघ 2 ऑक्टोबरपासून हिंदुस्थानच्या दौऱ्यावर येणार असून, दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेसाठी शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली 15 सदस्यीय संघ जाहीर झाला आहे. रवींद्र जाडेजा उपकर्णधारपदाची जबाबदारी सांभाळणार असून, देवदत्त पडिक्कल आणि एन. जगदीशन या नव्या चेहऱयांना संधी मिळाली आहे. नायरला मात्र अपेक्षित ती संधी मिळाली नाही. इंग्लंड दौऱ्यावर फलंदाजीत चमक दाखवू न शकल्यामुळे त्याच्यावर कुरघोडी झाली. त्याच्या कसोटी कारकीर्दीला दुसऱ्यांदा धक्का बसला.

निराश नायर पुढे म्हणाला, ‘संघात निवड होईल असे वाटले होते, पण हा माझ्यासाठी धक्का आहे. इंग्लंड दौऱ्यातील शेवटच्या कसोटीत पहिल्या डावात कोणी धावा केल्या नव्हत्या, तेव्हा मी अर्धशतक झळकावले होते. मला वाटते की मी योगदान दिले होते. तरीसुद्धा मला संधी मिळाली नाही, ही खंत जाणवणार.’

संघाची निवड केल्यानंतर निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी ‘आम्ही करुणकडून अधिक सातत्याची अपेक्षा केली होती. त्याने चार कसोटी सामने खेळले, पण सातत्याने चमक दाखवली नाही.