जलस्रोत आटले, तलाव कोरडेठाक, ४० हजार कसारावासीयांना पाणीटंचाईच्या तीव्र झळा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वाढत्या उष्णतेच्या झळांमुळे कसाऱ्यातील जलस्त्रोत आटले असून तलाव कोरडाठाक पडला आहे. त्यामुळे कसाऱ्यातील किमान चाळीस हजार लोकवस्तीला पाणीटंचाईच्या तीव्र झळा सोसाव्या लागत आहेत. पाण्यासाठी नागरिकांना टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. अपुऱ्या टँकरमुळे कसाऱ्यातील अनेक वार्डमध्ये नागरिकांना पाणी विकत घ्यावे लागत आहे. तर गावाबाजूच्या वसाहतीमधील महिलांना एक-दोन किमी पायपीट करून पाणी आणावे लागत आहे. मात्र हे पाणी दूषित व गढूळ असल्याने नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे.

कसाऱ्यातील तलावावर सुमारे बारा कोटींची पाणी योजना योजना बाराच्या भावात गेली आहे. त्यामुळे पाण्याचे प्रचंड हाल सुरु आहेत. त्यामुळे कसारावासियांना चार ते आठ दिवसांनी पाणी मिळत आहे. वाढत्या तापमानामुळे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होऊन पाणी योजनेचे मुख्य जलस्रोत असलेल्या तलावाने तळ गाठल्याने कसारा गावाला नियमित पाणीपुरवठा करणे अशक्य झाले आहे. याचा फटका ४० हजार लोकवस्तीला बसत आहे. कामधंदे सोडून लोकांना पाण्याच्या मागे धावावे लागत आहे.