
मुंबई, पुणे, ठाणे यासारख्या कोरोना हॉटस्पॉट असलेल्या ठिकाणांहुन रत्नागिरी जिल्ह्यात येणाऱ्या प्रवाशांसाठी जिल्ह्याचे प्रवेशद्वार असलेल्या कशेडी येथील तपासणी नाक्यावरील निर्बंध आता शिथिल करण्यात आले आहेत. त्यामुळे रेड आणि कंटेनमेंट झोनमधून आलेले प्रवाशी वगळता अन्य प्रवाशांना आपापल्या गावी जाणे सोपे झाले आहे. गावात मात्र त्यांना 14 दिवस घरातच स्वतःला क्वॉरंटाइन व्हावे लागणार आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्याचे प्रवेशद्वार असलेल्या कशेडी घाट येथे जिल्ह्यात येणाऱ्या प्रवाशांवर निर्बंध घालण्यात आले होते. या ठिकाणी जिल्ह्यात येणाऱ्या प्रत्येकाची आरोग्य तपासणी करून त्यांचे संस्थात्मक क्वॉरंटाईन केले जात होते. मात्र या प्रक्रियेला लागणार वेळ आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या अडचणी लक्षात घेत आता हे निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. कशेडी चेकपोस्टवरील नव्या नियमांनुसार रेडझोन आणि कन्टेनमेंट झोनमधून आलेले प्रवासी वगळता अन्य प्रवाशांना केवळ नाव, पत्ता, आणि संपर्क क्रमांक नोंदवून थेट त्यांच्या गावी जाण्याची मुभा देण्यात आली आहे. गावात मात्र या प्रवाशांना 14 दिवस होम क्वॉरंटाईन करण्याच्या सूचना ग्रामपंचायतीला करण्यात आल्या आहेत. मुंबई, पुणे, ठाणे यासारख्या मोठ्या लोकवस्तींच्या शहरांमध्ये कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढू लागल्यानंतर या शहरातील चाकरमान्यांनी आपल्या बायका-मुलांसह कोकणातील गावाकडे धाव घेतली. कोरोना हॉटस्पॉट असलेल्या शहरातून मोठ्या संख्येने जिल्ह्यात येणाऱ्या चाकरमान्यांमुळे जिल्ह्यात कोरोनाचा प्रादर्भाव होवू नये यासाठी रत्नागिरी जिल्ह्याचे प्रवेशद्वार असलेल्या कशेडी येथे जिल्हा प्रशासनाने तपासणी नाका सुरु केला होता.
सिंधूदुर्ग आणि गोवा येथे जाणाऱ्या वाहनाना जिल्ह्यात थेट प्रवेश दिला जात होता. मात्र, रत्नागिरी जिल्ह्यात येणाऱ्या चाकरमान्यांना तिथेच उतरवून त्यांचे स्वॅब घेण्यासाठी त्यांना लवेल येथील घरडा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतीगृहातील क्वॉरंनटाईन सेंटरमध्ये नेले जात होते. या ठिकाणी प्रवाशांचे स्वॅब घेऊन त्याचा अहवाल येईपर्यंत त्यांना क्वॉरंनटाईन केले जात होते. ज्यांचा अहवाल निगेटिव्ह येई त्यांना आपापल्या गावी पाठवले जात असे तर पॉझीटीव्ह आढळून येणाऱ्यांना रुग्णालयात दाखल केले जात होते. जिल्ह्यात असलेल्या 9 तालुक्यातील चाकरमान्यांना कशेडी येथेच उतरवण्यात येत असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होत होती. शिवाय लवेल येथील क्वॉरंनटाईन सेंटरमध्येही चाकरमान्यांची गर्दी होत होती. या पार्श्वभूमीवर आता कशेडी येथील तपासणी नाक्यावरील निर्बंध शिथिल करण्यात आले असून मुंबई पुणे येथून येणाऱ्या चाकरमानी रेड किंवा कन्टेनमेंट झोनमधील नसतील तर त्यांचे नाव, पत्ता, व मोबाईल क्रमांकाची नोंदणी करून त्यांना त्यांच्या गावात जाण्याची परवानगी दिली जात आहे.





























































