कश्मिरींचा विशेष हक्क राहणार की जाणार? आज सुनावणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
supreme-court

सामना ऑनलाईन। श्रीनगर

जम्मू-कश्मीरमधील नागरिकांना विशेष हक्क देणाऱया देशाच्या राज्यघटनेतील कलम ‘35 अ’ या कलमासंदर्भातील याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर कश्मीर खोऱयात तणाव असून खबरदारीचा उपाय म्हणून शुक्रवारनंतर रात्रभरात जमात-ए-इस्लामी जम्मू-कश्मीर या संघटनेच्या जवळपास 150 जणांची धरपकड करण्यात आली आहे.

राज्यघटनेच्या कलम ‘35 अ’अन्वये जम्मू-कश्मीरमधील नागरिकांना काही विशेष हक्क देण्यात आले आहेत. 1954 मध्ये ही तरतूद राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आली होती. या कलमाला न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. ही सुनावणी सोमवारी होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यात तणाव स्पष्ट दिसत असून सुरक्षा बंदोबस्तही कडक करण्यात आला आहे. निमलष्करी दलाच्या अतिरिक्त 100 तुकडय़ा तैनात करण्यात आल्या आहेत.

‘जमात’वरील पहिलीच महत्त्वाची कारवाई

‘जमात’च्या कार्यकर्त्यांची धरपकड हा नियमित कारवाईचा भाग असल्याचे पोलीस सांगत असले तरीही या घडामोडींची माहिती असलेल्या पोलीस अधिकाऱयांच्या मते जमात-ए-इस्लामीवरील ही पहिलीच महत्त्वाची कारवाई आहे. सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीच्या पार्श्वभूमीवर फुटीरतावाद्यांच्या नेत्यांची धरपकड करण्यात आली असून जम्मू-कश्मीर लिबरेशन फ्रंटचा नेता यासिन मलिक यालाही शुक्रवारी रात्री ताब्यात घेण्यात आले होते.