
शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागात कोरोना नियंत्रणात आलेला असला तरी त्याचा पुन्हा उद्भव होऊ नये तसेच सर्वत्र आता व्यवहार, व्यापार, दळणवळण, लग्नकार्य मोठ्या प्रमाणात सुरु झाले आहेत. दक्षता म्हणून आरोग्य विभाग सतर्क झाला आहे.
व्यापाऱ्यांच्या दुकानात खरेदीसाठी होणारे ग्राहकांचे आवागमन लक्षात घेत अशा सुपर स्पेडर व्यक्तींची (व्यावसायिकांची) कोविड 19 पी टी पी सी आर अंतर्गत कोरोना तपासणी मोहीम सुरु करण्यात आल्याची माहिती कवठे येमाई प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नामदेव पानगे यांनी दिली.
ही कोरोना तपासणी मलठण कोविड सेंटरला जाऊन करून घ्यावी म्हणून कवठे येमाई प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने कवठे गावातील 184 व्यावसायिकांना लेखी सूचना देण्यात आल्या. आरोग्य सेविका एस एच वैष्णव यांच्या मार्गदर्शनाखाली आशा सेविका विद्या उघडे, अर्चना उघडे, मनीषा पोकळे, कविता मुंजाळ, मीरा कांदळकर,सुरेखा खाडे,प्रभावती कांदळकर, सुंदर मुंजाळ यांनी प्रत्येक व्यावसायिकांच्या दुकानांना प्रत्यक्ष भेटी देत या लेखी सूचना दिल्या.
तर कोरोना प्रतिबंधक उपाय योजना विषयी आरोग्य विभाग व प्रशासन वेळोवेळी देत असलेल्या सूचनांचे नागरिकांनी पालन करण्याचे आवाहन डॉ.पानगे यांनी केले आहे.

























































