बिबट्याचा शेतकरी दांपत्यावर हल्ल्याचा प्रयत्न

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। कवठे येमाई

शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागात बिबट्यांची दहशत कायम आहे. बुधवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास निमगाव निमगाव दुडे येथील शेतकरी नवनाथ गोरक्षनाथ चौधरी आणि त्यांची पत्नी शोभा चौधरी चारा (कडवळ) कापत होते. त्याचवेळी अचानक बिबट्याने त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण चौदरी दांपत्याने गवत कापायचे विळा त्याच्यावर उगारत आरडा- ओरडा केला. यामुळे भेदरलेल्या बिबट्याने तिथून धूम ठोकली.

त्यानंतर चौधरी पती-पत्नीने तातडीने गावातील ग्रामस्थांना फोनवरून झालेली घटनेची माहिती दिली. त्यानंतर सगळ्यांनी चौधरींच्या शेतात धाव घेत काठ्या व गोफणींचा आवाज काढत बिबट्याला पिटाळून लावण्याचा प्रयत्न केला.

याबद्दल शिरूर वनविभागाच्या वनपाल सी ए काटे यांना कळवताच त्यांनी तात्काळ वन कर्मचारी हनुमंत कारकूड यांना निमगाव दुडे येथे पाठवत योग्य ती दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर कारकूड यांनी घटनास्थळी दाखल होत स्थानिकांची बिबट्याच्या बंदोबस्तासाठी तातडीने पिंजरा लावण्याची मागणी वरिष्ठांना कळवली.

प्रचंड दुष्काळात उसाचे क्षेत्र फारच कमी झाले असले तरी अद्याप ही या भागात बिबट्याचे वास्तव्य असल्याचे या घटनेवरून सिद्ध झाले आहे. बिबट्याच्या दर्शनाने संपूर्ण गावात दहशतीचे वातावरण पसरले आहे. बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.