
सामना प्रतिनिधी। परळी वैजनाथ
यावर्षी बीड जिल्ह्यात अपेक्षित पाऊस न पडल्याने पर्जनवृष्टीसाठी परळीच्या वैद्यनाथास जलाभिषेक करण्यात आला. पाण्याची टंचाई लक्षात घेता नाथ प्रतिष्ठानद्वारे झाडे लावणे टँकरद्वारे पाणी पुरवठा करणे असे उपक्रम याआधी राबवले गेले आहेत.पाऊस पडण्यासाठी सर्व धर्मीय जनता देवाकडे प्रार्थना करत आहेत. याचाच एक भाग म्हणून मंगळवार दि 25 रोजी सकाळी ठीक 11 वा.नाथ प्रतिष्ठानच्या वतीने गंगाखेड़ येथील गंगेतून गंगाजल परळीत पायी चालत आणण्यात आले. छत्रपती संभाजी राजे चौक येथून भव्य कावड यात्रा काढून नागरिकांच्या वतीने ज्योतिर्लिंग क्षेत्र प्रभु वैद्यनाथास जलाभिषेक करण्यात आला.
महादेवाचे गुण-गाण करत ही कावड यात्रा उड्डाण पूल,स्टेशन रोड,राणी लक्ष्मीबाई टॉवर,गणेश पार,नांदूरवेस,अंबेवेस,नेहरू चौक तळ परिसरातून वैद्यनाथ मंदिरात पोचली. परळीतील नागरिकांनी या जलाभिषेक यात्रेस मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन नाथ प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आलेले आहे. या कावड यात्रेत नाथ प्रतिष्ठानचे पदाधिकारी व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.या जलाभिषेका नंतर सर्वधर्मीय धर्मगुरूद्वारे वैद्यनाथ मंदिर परिसरात बेलवाडी समोरील प्रांगणात प्रार्थना करण्यात आली.






























































