जर्मन शिकूया मराठीतून, चार वर्षांत 1100 जणांना विनामूल्य प्रशिक्षण

विदेशीभाषा शिकायला अनेकांना आवडते. मात्र तशी संधी प्रत्येकाला मिळेलच असे नाही. आणि जरी संधी मिळाली तरी भाषा विदेशी भाषा शिकण्यासाठी येणारा खर्च खिशाला परवडेलच असे नाही. मग ज्यांना मनापासून एखादी भाषा शिकायची आहे. अशा लोकांचे काय? नेमका हाच विचार करून जर्मन देशातील म्युनिक शहरात राहणारे केदार जाधव गेल्या चार वर्षापासून मराठी लोकांना जर्मन भाषा विनामूल्य ऑनलाईन माध्यमातन शिकवत अहेत .या काळात त्यांनी 44 बॅचमधून त्यांनी 1100 पेक्षा अधिक जणांना उत्तम जर्मन शिकवले आहे. यातील कितीतरी जणांनी वेगवेगळ्या लेव्हलला 100 टक्के गुण मिळवले आहेत. जर्मन शिकूया मराठीतून या त्यांच्या उपक्रमाला महाराष्ट्रातून खूप भरभरून प्रतिसाद लाभत आहे.

मूळचे इचलकरंजी, कोल्हापूर येथे राहणारे केदार जाधव सध्या म्युनिक येथे राहतात. ते डिझाईन इंजिनियर आहेत. जर्मनीला जाण्याआधी आवड म्हणून त्यांनी पुण्यात जर्मन भाषा शिकली होती. गोएथे इन्स्टिट्यूटमधून जर्मन भाषेचे सर्वोत्तम मानले गेलेले आणि सर्वात कठीण सी 2 सर्टिफिकेशन पूर्ण केले आहे. आता ते मराठीतून जर्मन भाषा शिकवत आहेत. याविषयी केदार जाधव म्हणाले, ज्याला ज्याला जर्मन शिकायची इच्छा आहे. त्याला विनामूल्य शिकता यावं हा उद्देश आहे. जर्मन भाषा येते त्याला जर्मनीत प्रचंड संधी उपलब्ध आहेत. मात्र हिंदुस्थानात शिकणं घोडंसं कठीण आहे. चांगल्या क्लासच्या फी प्रत्येक लेव्हलला हजारोंच्या घरात आहेत. छोटा शहरांत किंवा गावात हे क्लासेस उपलब्ध नाही. सर्वात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा जर्मन शिकतो तेव्हा इंग्रजीत शिकतो. ते बऱ्याच लोकांना अवघड जातं. मी मराठी लोकांना सोपं पडावं म्हणून जर्मन भाषा मराठीत शिकवतो. इथे गेली चार वर्षे स्काईपच्या माध्यमातून शिकवल्यानंतर आता केदार जाधव यांनी यूट्यूब चॅनेल सुरू केले आहे. त्यावर दर आठवड्याला एक-दोन व्हिडिओ ते अपलोड करणार आहेत. सध्या पहिले ९ व्हिडियो अपलोड केले आहेत. जर्मन अल्फाबेट्स कशी शिकायची, सोपी वाक्येरचना कशी बनवायची. जर्मन आकडेवारी किंवा क्रियापदे शिका.  अशा स्वरूपाचे हे व्हिडिओ आहेत. या प्रत्येक व्हिडीओंना हजारो व्ह्यूज मिळत आहेत. केदार जाधव यांची पत्नी कविता – जाधव यांनी बी 2 लेव्हल पूर्ण केली आहे. तर त्यांची सहा वर्षाची मुलगी ओवी ही जर्मन माध्यमाच्या शाळेत शिकते.

मराठी शाळांमध्ये शिकवायचंय

केदार जाधव यांच्याकडे विनामूल्य जर्मन शिकणाऱयांमध्ये ऑटो इंडस्ट्री, फायनान्शियल इन्स्टिटय़ूट, मेकॅनिकल इंजिनियरींग क्षेत्रांतील क्यक्तींची संख्या अधिक आहे. याशिवाय गृहिणी, ज्येष्ठ नागरिक यांचेही प्रमाण लक्षणीय आहे. येत्या काळात गावोगावच्या शाळा, कॉलेज, संस्थांसोबत टायअप करण्याचा जाधव यांचा विचार आहे. अनेक संस्थांनी जर्मन भाषा शिकवण्यासाठी जाधव यांना संपर्क साधला आहे. त्यांच्यासाठी सुरुवातीला 45 मिनिटांचा पायलट सेशन घेऊन नंतर महिन्यातून एकदा विनामूल्य शिकवता येईल, असा जाधव यांचा विचार  आहे.

जर्मनमराठीत साम्यस्थळं

जर्मन आणि मराठीत अनेक साम्यस्थळं आहेत. मराठीतील तो, ती, ते जर्मनमध्ये आहे. मराठीतील आदरार्थी अनेककचन ‘आपण’ जर्मनमध्ये आहे. एवढंच काय मराठी आणि जर्मन क्रियापदे अगदी एकसारखी चालतात.  जर्मन ही सगळ्यात ‘फोनेटिकली करेक्ट’ भाषा असल्याचे केदार जाधव सांगतात.

आपली प्रतिक्रिया द्या