
हिवाळा सुरू झाल्याने मंगळवारी सकाळी हिमालयातील पवित्र तीर्थक्षेत्र असलेल्या केदारनाथची पवित्र कवाडे विधिपूर्वक बंद करण्यात आली. या धार्मिक सोहोळ्याला सुमारे 1200 भक्त उपस्थित होते.
बर्फाच्छादित केदारनाथ मंदिरातील पवित्र कवाडे बंद झाल्यानंतर तेथील भगवान शंकराची मूर्ती मोठ्या भक्तिभावाने फुलांच्या मखरात बसवून “जय बाबा केदार ” या घोषणेच्या नादात उखीमठ येथील ओंकारेश्वर शिव मंदिराकडे रवाना झाली. मोठ्या मिरवणुकीत बाबा केदारनाथाची मूर्ती रामपूर आणि गुप्तकाशी मार्गे 31 ऑक्टोबरला ओंकारेश्वर मंदिरात आणण्यात येईल. पुढील सहा महिने ओंकारेश्वर मंदिरातच मुर्तीची पूजा होणार आहे. हिवाळ्यात होणाऱ्या हिमवृष्टीमुळे केदारनाथ मंदिरातील बाबा केदारनाथ मूर्तीची पूजाअर्चा ओंकारेश्वर मंदिरातच केली जाणार आहे. जम्मू -कश्मीर लाईट इन्फन्ट्री बँडच्या वादनात भगवान केदारनाथाची मूर्ती पुढील प्रवासासाठी ओंकारेश्वर मंदिराकडे नेण्यात येणार आहे. त्यानंतर सहा महिने बाबा केदारनाथाची पूजा त्याच मंदिरात होणार आहे. यंदा केदारनाथ मंदिराला देशभरातील 9 लाख 97 हजार 585 भक्तांनी भेट दिली.






















































