केडगाव हत्याकांड खटल्यासाठी ऍड. मिसर यांची नियुक्ती करा, डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या सूचना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नगर महापालिका पोटनिवडणुकीनंतर केडगाव परिसरात झालेल्या शिवसैनिकांच्या हत्याकांड खटल्यात विशेष सरकारी वकील म्हणून ऍड. अजय मिसर यांची नियुक्ती करण्याचे निर्देश विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱहे यांनी दिले आहेत. त्यामुळे कोतकर आणि ठुबे कुटुंबीयांनी आझाद मैदानावर सुरू असलेले उपोषण मागे घेतले आहे.

7 एप्रिल 2018 रोजी शिवसेनेचे पदाधिकारी वसंत ठुबे व संजय कोतकर यांची हत्या झाली होती. या प्रकरणाचा तपास सीआयडी करत आहे. पूर्वीच्या तपास अधिकाऱयांनी काही चुकीचे शपथपत्र दिल्याचे कोतकर आणि ठुबे कुटुंबीयांचे म्हणणे असून, या संदर्भात त्यांनी मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण सुरू केले होते. या उपोषणाची माहिती मिळताच विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱहे यांनी गृह विभागाच्या अपर मुख्य सचिवांची बैठक बोलावली. त्यांनी या खटल्यात ऍड. अजय मिसर यांची तत्काळ नियुक्ती करण्याचे निर्देश दिले. तसेच, सीआयडी अधीक्षक श्रीकांत धावरे आणि तपास अधिकारी नारायण सस्ते यांना पुढील तपासाबाबत काळजी घेण्याची सूचना केली. शिवाय पीडित कुटुंबीयांना सहकार्य करण्याचे निर्देशही दिले.

या खटल्यात अधिकाऱयांनी दुर्लक्ष केले असेल त्यांच्यावर कार्यवाही करण्याची सूचनादेखील डॉ. गोऱहे यांनी केल्या आहेत. दरम्यान, या बैठकीनंतर कोतकर व ठुबे कुटुंबीयांनी डॉ. नीलम गोऱहे यांच्या हस्ते सरबत पिऊन आपले उपोषण मागे घेतले. यावेळी शिवसेना नगर जिल्हा संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर उपस्थित होते.