
तालुक्यातील केळोशी-हणबरवाडी येथील रस्त्याचे काम गेल्या दोन वर्षांपासून रखडले आहे. कंत्राटदार व बांधकाम विभागाकडे वारंवार तक्रार करूनही त्यांनी त्याकडे अक्षम्य दुर्लक्ष केले आहे. गेल्यावर्षी उखडलेल्या रस्त्यावर माती पसरली असून, पावसाळ्यात या रस्त्यावर गुडघ्यापर्यंत चिखल असतो. त्यातून चालणेही अशक्य असते. दळणवळणासाठी दुसरा मार्गच नसल्याने गर्भवती महिला व अबालवृद्धांवर वेळेत उपचार होत नाहीत. त्यामुळे उपचाराअभावी नागरिकांना जीव गमवावा लागल्यास संबंधित ठेकेदार व बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्याची मागणी हणबरवाडी ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे केली आहे.
हणबरवाडी गावाला अद्यापी पक्का रस्ता नसल्याने आमदार प्रकाश आबिटकर यांनी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून रस्ता मंजूर केला. संबंधित ठेकेदाराने गतवर्षी या रस्त्याचे काम सुरू केले. डोंगररांगातून रस्ता असल्याने गतवर्षी खोदकाम करण्यात आले. हे गाव घाटमाथ्यावर असल्याने येथे दरवर्षी सुमारे 6000 मि.लि.पेक्षा जास्त पाऊस पडतो. त्यामुळे रस्त्यावर चिखल व गाळाचे साम्राज्य असते. डोंगररांगा व घनदाट जंगल असल्याने ये-जा करण्यासाठी दुसरा कुठलाही पर्यायी मार्ग नाही. चालू वर्षी काम पूर्ण होईल या आशेमुळे अद्यापी कुणीही तक्रार केलेली नाही.
यावर्षी ठेकेदाराने रस्त्याचे काम सुरूही केले, पण महिन्याभरात पुन्हा काम बंद केले असून, गेले दोन महिने काम ठप्प आहे. काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या या वर्षीच्या पावसाळ्यात लोकांना चालत ये-जा करण्यासाठी किमान खडीकरणाचे काम पूर्ण करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली असून, उपचाराअभावी एखाद्याचा मृत्यू झाल्यास संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात यावे, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनावर विनोद सुतार, विशाल जरंडे, राजू कदम, सागर वाडकर, गणेश जरंडे आदीसह ग्रामस्थांच्या सह्या आहेत.
पाच महिन्यांपूर्वी म्हासुर्ली येथील धनगरवाड्यावर रस्ता नसल्याने उपचाराअभावी एका मातेला व तिच्या नवजात बालकाला जीव गमवावा लागला होता. तसा दुर्दैवी प्रकार घडल्यास ठेकेदार व ठेकेदाराला गेली दोन वर्षे पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांसोबत ग्रामस्थांचा संघर्ष अटळ आहे.
– शिवाजी जरंडे, ग्रामस्थ.






























































