केईएम दुर्घटना, प्रिन्सला 10 लाखांची भरपाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पालिकेच्या केईएम रुग्णालयात ईसीजी मशीनमध्ये लागलेल्या आगीमुळे हात गमवावा लागलेल्या चार महिन्यांच्या प्रिन्स राजभर याला 10 लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय पालिकेने घेतला. सर्वपक्षीय गटनेत्यांच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. यात पाच लाख रुपये प्रिन्सच्या नावावर डिपॉझिट स्वरूपात ठेवण्यात येणार असून पाच लाख तातडीने देण्यात येणार असल्याची माहिती महापौर प्रिं. विश्वनाथ महाडेश्वर यांनी दिली.

प्रिन्स याला केईएम रुग्णालयात हृदयावर उपचार करण्यासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र 7 नोव्हेंबरला ईसीजी मशीनमध्ये शॉर्टसर्किट होऊन लागलेल्या आगीत प्रिन्सच्या हाताला आणि कानाला जबर इजा झाली. यात गँगरीन झाल्याने हात काढून टाकावा लागला. त्यामुळे पालिकेने दहा लाखांची भरपाई द्यावी अशी मागणीही करण्यात येत होती. त्यामुळे आज गटनेत्यांच्या विशेष बैठकीत दहा लाख रुपये मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, नायर रुग्णालयात दोन वर्षांपूर्वी एमआयआर मशीनमध्ये ओढला गेल्याने मृत्यू झालेल्या राजेश मारू यांच्या कुटुंबीयांनाही दहा लाख आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, पालिकेच्या कार्यक्षेत्रात मृत्युमुखी किंवा जखमी होणाऱयांना तातडीने मदत करण्यासाठी ठोस धोरण बनवण्याचे निर्देशही देण्यात आल्याची माहिती सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी दिली. यावेळी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, सुधार समिती अध्यक्ष सदा परब, शिक्षण समिती अध्यक्षा अंजली नाईक, विधी समिती अध्यक्षा शीतल म्हात्रे, ‘बेस्ट’ समिती अध्यक्ष अनिल पाटणकर, विरोधी पक्षनेते रवी राजा, सपाचे रईस शेख, राष्ट्रवादीच्या राखी जाधव, पालिका आयुक्त प्रवीण परदेशी आदी उपस्तित होते.

सीईओंच्या जागी माजी उपअधिष्ठाता

पालिकेच्या रुग्णालयांतील कारभारात समन्वय आणि सुसूत्रता आणण्यासाठी पालिकेने केईएम, कूपर, नायर आणि शीव रुग्णालयात सीईओ नेमून त्यांचा कारभार सहाय्यक आयुक्तांच्या हाती देण्याचा निर्णय घेतला आहे. याला शिवसेनेसह सर्वपक्षीयांनी जोरदार विरोध केला आहे. सहाय्यक आयुक्तांवर ही अतिरिक्त जबाबदारी टाकल्यास त्यांच्यावर कामाचा ताण वाढून वॉर्डमधील कामावर विपरीत परिणाम होणार असल्याचे सभागृह नेत्या विशाखा राऊत म्हणाल्या. या पार्श्वभूमीवर सीईओंच्या जागी पालिकेने रुग्णालयाच्या माजी उपअधिष्ठांताची नेमणूक करावी, अशा सूचनाही करण्यात आल्या. याला पालिका आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद देत चार दिवसांत कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे.