तामिळनाडूला तडाखा देत ‘गजा’ केरळमध्ये दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। एर्नाकुलम

तामिळनाडूला तडाखा दिल्यानंतर गजा वादळ केरळमध्ये धडकले असून येथील अनेक भागात जोरात पर्जन्यवृष्टी होत आहे. यामुळे राज्यातील अनेक गावं पाण्याखाली गेली असून काही ठिकाणी दरड कोसळल्याच्या घटनाही घडल्या आहेत. एर्नाकुलम, कोट्टायमस,कोझिकोड, कासारगोड यांसह केरळमधील इतर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस कोसळत आहे. दरम्यान, राज्यात येत्या 12 तासात वेगवान वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

2004 साली आलेल्या त्सुनामीनंतर तामिळनाडूमध्ये गजा वादळाने हाहाकार उडवला आहे. यात आतापर्यंत 36 जणांचे बळी गेले असून शेकडो नागरिक बेघर झाले आहेत. वादळग्रस्तांना मदत करण्यासाठी अनेक बचाव पथके तामिळनाडूत दाखल झाली आहेत. याचदरम्यान गजा वादळाने आपला मोर्चा केरळकडे वळवला आहे. मुसळधार पावसामुळे एर्नाकुलम येथे 200 घरांची पडझड झाली असून अनेक ठिकाणी वीजेचे खांब व तारा उखडल्याने गावं अंधारात गेली आहेत. केरळच्या किनाऱ्यावर सध्या ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्याचा वेग 60 पर्यत पोहचण्याची शक्यता आहे्. यामुळे मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.