लग्नास नकार दिल्याने अल्पवयीन मुलीला जिवंत जाळून तरुणाची आत्महत्या

564

केरळमध्ये एकतर्फी प्रेमातून एका माथेफिरुने अल्पवयीन मुलीवर पेट्रोल ओतून तिला जिवंत जाळले. त्यानंतर स्वत:ला पेटवले. यात दोघांचा मृत्यू झाल्याची भयंकर घटना कोक्कानड येथे घडली आहे. देविका असे (17) मृत मुलीचे नाव असून मिथुन (20) असे तरुणाचे नाव आहे.

मिथुन देविकाचा नातेवाईक होता. त्याचे तिच्यावर एकतर्फी प्रेम होते. त्याला तिच्याबरोबर लग्न करायचे होते. पण देविकाच्या घरच्यांचा त्याला विरोध होता. यावरुन त्यांच्यात वादही झाला होता. काही दिवसांपुर्वी मिथुनने देविकाच्या घरात घुसुन तिला भेटण्याचा प्रयत्न केला होता. पण देविकाच्या घरातल्यांनी त्याला हाकलून लावले व त्याच्याविरोधात पोलिसात तक्रार केली होती. पोलिसांनी दोन्ही कुटुंबात मध्यस्थी करत मिथुनला समज देत सोडले होते. पण या घटनेनंतर तो अधिकच पेटला होता.

गुरुवारी तो अचानक देविकाच्या घरी गेला व तिला भेटण्याचा हट्ट करू लागला. पण तिच्या घरातल्यांनी नकार देत त्याला तिथून जाण्यास सांगितले. पण मिथुन तिथेच लपून बसला. त्यानंतर देविका काही कामासाठी घराबाहेर पडताच मिथुनने तिच्या अंगावर सोबत आणलेले पेट्रोल ओतले व तिला पेटवून दिले. त्यानंतर त्याने स्वत:लाही पेटवून घेतले. यावेळी देविकाला वाचवताना तिचे वडीलही भाजले. त्यानंतर तिघांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाला.

आपली प्रतिक्रिया द्या