
2018 च्या महापुरात केरळला जबरदस्त फटका बसला होता. हजारो लोकांचे संसार पुरात वाहून गेले. घरे, शेती, व्यवसाय उद्ध्वस्त झाले. केरळ पुन्हा सावरला, पण अजूनही तो जमिनीतून सरकतोय. केरळच्या बहुतांश भागांतील जमिनीची धूप होत आहे असे पवई येथील आयआयटी मुंबईतील संशोधकांनी केलेल्या अभ्यासात आढळून आले आहे. मातीची सतत धूप होत असल्याने दरडी कोसळण्यासारख्या नैसर्गिक आपत्ती भविष्यात घडण्याचा धोका कायम आहे असा इशारा या अहवालात देण्यात आला आहे.
2018 च्या ऑगस्ट महिन्यात केरळमध्ये महापूर आला होता. हवामान खात्याच्या अंदाजापेक्षाही 96 टक्के जास्त पाऊस झाल्याने केरळमधील बहुतांश भागाला त्या महापुराने व्यापले होते. 330 ठिकाणी दरडी कोसळल्या होत्या. त्या महापुरामुळे केरळच्या अर्थव्यवस्थेला 31 हजार कोटी रुपयांचा फटका बसला होता. 100 पेक्षा जास्त नागरिक त्या महापुरात मृत्युमुखी पडले आणि केरळमधील सुमारे 300 एकरच्या परिसरातील चहा, काॅफीच्या पिकांचे नुकसान झाले. एखाद्या राज्यात महापूर आला तर त्यानंतरही बराच काळ तेथील मातीची धूप होत राहते. त्यामुळे दरडी कोसळण्याच्या घटना घडत राहतात. देशात मुसळधार पाऊस आणि त्यामुळे उद्भवणाऱया पूरस्थितीमुळे मातीची धूप होऊन दरडी कोसळण्याच्या घटना गेल्या काही वर्षांत विशेषतः केरळमध्ये वाढल्या असल्याचे पवई येथील आयआयटी मुंबईतील सेंटर फॉर टेक्नॉलॉजी आल्टरनेटिव्हज फॉर रुरल एरियाज (सितारा) या संस्थेतील संशोधकांनी केलेल्या अभ्यासात दिसून येते. त्यांचा संशोधन अहवाल नुकताच ‘जर्नल ऑफ द इंडियन सोसायटी ऑफ रिमोट सेन्सिंग’मध्ये प्रसिद्ध झाला.
या बाबी अभ्यासल्या गेल्या
- पावसाचे प्रमाण n जमिनीचे डिजिटल नकाशे n रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट छायाचित्रे n जमिनीची उंची n विविध ठिकाणी झालेली मातीची धूप.
महापूर आणि नैसर्गिक आपत्तीच्या घटना गेल्या दशकापासून दरवर्षी घडत आहेत. त्यामागे हवामान बदल हे एकमेव कारण नसून जमिनीच्या वापरामध्ये झालेला बदल, जमिनीची बदलणारी स्थितीही त्याला जबाबदार आहे. अहवालाच्या आधारे उपाययोजना करून संभाव्य दुर्घटना टाळता येऊ शकतील. – प्रा. पेन्नन चिन्नासामी
इडुक्की जिह्याला सर्वाधिक फटका
महापुरादरम्यान सर्वाधिक पाऊस इडुक्की जिह्यात कोसळला होता. त्यामुळे तेथील मातीची धूप सर्वाधिक 220 टक्के झाल्याचे संशोधकांना आढळले. त्यानंतर एर्नापुलम जिह्यात मातीची धूप 95 टक्के इतकी झाली. पर्यावरणाचा ऱहास करून मानवी वस्तीच्या अतिक्रमणामुळे इडुक्कीचे अधिक नुकसान झाल्याचे संशोधकांचे मत आहे. 2017 मध्ये करण्यात आलेल्या अभ्यासात असे दिसून आले होते की, 1925 ते 2012 या कालावधीत इडुक्की जिह्यातील जंगल 44 टक्के नष्ट झाले होते. मुंबईतील ‘रुरल डाटा रिसर्च अॅण्ड अॅनालिसिस’ या संस्थेतील संशोधकही या अभ्यासात सहभागी होते. भविष्यात संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी तसेच नैसर्गिक स्रोतांच्या रक्षणासाठी योजना बनवण्यास केरळ सरकारला आयआयटी मुंबईतील संशोधकांचा हा अभ्यास अहवाल महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
























































