कॅबिनेट मंत्र्याचे अनैतिक संबंध; बेडरूममध्ये महिलेसोबत रंगेहात पकडलं; पत्नीच्या आरोपांनी राजकीय वर्तुळात खळबळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केरळचे परिवहन मंत्री के. बी. गणेश कुमार यांच्यावर त्यांच्या पत्नीने अनैतिक संबंधांचा आरोप केला आहे. गेल्या शनिवारी राहत्या घरी मंत्र्याला दुसऱ्या एका महिलेसोबत रंगेहात पकडल्याचा दावा गणेश कुमार यांची पत्नी बिंदू मेनन यांनी सोमवारी केला. यावेळी मंत्र्यांच्या समर्थकांनी आपल्याला धक्काबुक्की केली आणि पोलिसांनी घरात येण्यापासून रोखले, असा आरोपही त्यांनी केला आहे. यामुळे केरळच्या राजकारणात एकच खळबळ उडाली असून सत्ताधारी पक्ष आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी अडचणीत आला आहे.

माध्यमांशी बोलताना बिंदू मेनन पती गणेश कुमार यांच्यावर गंभीर आरोप केले. गेल्या दोन महिन्यांपासून मी बाहेर होते आणि त्यांनी माझा नंबर ब्लॉक केला होता. हे प्रकरण कायमचे मिटवण्यासाठी मी कोल्लम येथील त्यांच्या घरी गेले. त्यावेळी बेडरूममध्ये जे मी पाहिले, ते मी शब्दांत व्यक्त करू शकत नाही. जे घडायला नको होते, ते तिथे घडत होते. मी त्याचे फोटो काढले, पण त्यांच्या ड्रायव्हरने मला रोखण्याचा प्रयत्न केला, असा खळबळजनक दावा बिंदू मेनन यांनी केला. ‘इंडियन एक्सप्रेस‘ने याबाबत वृत्त दिले आहे.

माजी डीजीपी आर. श्रीलेखा यांच्या सल्ल्यानुसार मी पोलिसांना बोलावले होते. मात्र, गणेश कुमार यांच्या समर्थकांनी पोलिसांना घरात शिरू दिले नाही आणि संबंधित महिलेला तिथून बाहेर काढले, असा दावाही बिंदू मेनन यांनी केला. केरळमधील काँग्रेस विद्यार्थी संघटनेचे उपाध्यक्ष यदू कृष्णन यांनीही याबाबत सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.

गणेश कुमार यांनी आरोप फेटाळले

दरम्यान, परिवहन मंत्री गणेश कुमार यांनी पत्नीचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. गणेश कुमार यांनी हा निवडणुकीचा स्टंट असल्याचेही म्हटले. यावेळी त्यांनी उपरोधिकपणे माझे 5000 महिलांशी प्रेमसंबंध आहेत, असेही म्हटले. ज्यांचे प्रेमसंबंध नसतात ते मूर्ख असतात. कोणत्याही वेड्या माणसाने पोलिसांशी संपर्क साधला तर त्याला मी काय करू? माझ्या वैयक्तिक आयुष्यात कोणीही हस्तक्षेप करू नये, असेही ते यावेळी म्हणाले.

विरोधकांचा हल्लाबोल

दरम्यान, विरोधी पक्षनेते व्ही. डी. सतीसन यांनी या मुद्द्यावरून सरकारवर टीका केली आहे. एका मंत्र्याच्या पत्नीला जर पोलीस न्याय देऊ शकत नसतील, तर केरळमध्ये महिला सुरक्षित कशा? पोलिसांनी तिचा जबाब का नोंदवला नाही? मुख्यमंत्र्यांनी याचे उत्तर द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.