
राष्ट्रवादीचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांच्याबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणारी अभिनेत्री केतकी चितळे हिचा ठाणे तुरुंगातील मुक्काम 7 जूनपर्यंत वाढला आहे. तिचा जामीन अर्ज न्यायालयाने आज फेटाळून लावला. केतकी चितळे हिने केलेला गुन्हा गंभीर असल्याने तिला जामीन देता येणार नाही, असे न्यायमूर्तींनी म्हटले आहे.
केतकी चितळे हिने टाकलेल्या पोस्टनंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली. तिच्यावर ठाण्यासह राज्याच्या विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे नोंदवण्यात आले. केतकीच्या वकिलाने ठाणे सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला. त्यावर आज सुनावणी होऊन न्यायमूर्तींनी हा अर्ज फेटाळून लावला आहे. रबाळे पोलीस ठाण्यांतर्गत तिच्यावर अॅट्रॉसिटी प्रकरणात गुन्हा दाखल असून यासंदर्भात पोलिसांचा जबाब बाकी आहे. त्यामुळे तिचा तुरुंगातील मुक्काम आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यात केतकी चितळे ही रबाळे पोलिसांच्या ताब्यात आहे. तिच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्याने न्यायालयात हजर केले होते. 2020 मधील हा गुन्हा असून अटकपूर्व जामिनासाठी याआधीदेखील केतकीने न्यायालयात अर्ज केला होता. तेव्हाही तो फेटाळण्यात आला. याच प्रकरणामध्ये तिला रबाळे पोलिसांनी 19 मे रोजी ताब्यात घेतले. आता सर्वांचे लक्ष पुढील सुनावणीकडे लागले आहे.





























































