
सामना प्रतिनिधी । पारनेर
खडकवाडी ते बोरवाक रस्त्याचे काम न करताच तब्बल ५ लाख ९० हजार ३३७ रुपयांचा अपहार झाल्याची तक्रार खडकवाडी ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली आहे. दोषी अधिकारी तसेच ठेकेदाराविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करून निलंबनाची कारवाई न झाल्यास १२ जून पासून उपोषनाचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
दुर्गम बोरवाकला जोडणाऱ्या रस्त्याचे खडीकरण व मुरुमीकरण करण्यासाठी जिल्हा परिषदेकडून ६ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला होता. कामाच्या टेंडर प्रक्रियेनंतर ठेकेदाराने काहीच काम केले नाही. कामाचे बिल अदा करण्यापूर्वी ठेकेदाराने जुजबी मुरूम टाकला. सीडी वर्क साठी सिमेंट पाईप आणण्यात आले मात्र हे कामच करण्यात आले नाही. यासंदर्भात ग्रासमस्थांनी जि. प. सदस्य काशिनाथ दाते यांच्याकडे तक्रार केल्यानंतर दाते यांनी संबंधित शाखा अभियंता, उपअभियंता यांच्याकडे चौकशी केली असता बेजबाबदार उत्तरे देण्यात येऊन आवश्यक कागदपत्रे कार्यालयात उपलब्ध नसल्याचे लेखी पत्र देण्यात आले.
पंचायत समितीकडे तक्रार करूनही दाखल न घेतल्याने ग्रामस्थांनी मुख्य कार्यकारी अधकाऱ्यांकडे दाद मागितली आहे. शाखा अभियंता, उपअभियंता यांच्यासह ठेकेदारावर फौजदारी गुन्हा दाखल करावा व अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी अन्यथा १२ जुन पासून जिल्हा परिषदेत बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
































































