ओबीसी आरक्षणाला धक्का लागता कामा नये!

सामना ऑनलाईन । नगर

‘कोणाला किती आरक्षण द्यायचे त्याचा निर्णय तुम्ही घ्या पण आमच्या ताटातला घास हिसकावून घेण्याचा प्रयत्न करू नका. ओबीसी आरक्षणाला धक्का लागता कामा नये. तसे झाल्यास आमच्या सरकारला जाब विचारणारा मी पहिला माणूस असेन’ असा इशारा माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी दिला. ‘मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्या. त्यासाठी कोणाचेही आरक्षण हिरावून घेऊ नका’, असेही खडसे म्हणाले.

‘ओबीसी फाऊंडेशन इंडिया’च्या वतीने ओबीसी समाजातील एमपीएससी, यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झालेल्यांचा ‘समाजभूषण’ पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला त्यावेळी खडसे बोलत होते. यावेळी आमदार नरेंद्र दराडे, माजी आमदार प्रकाश शेंडगे, ह.भ.प. आदिनाथ महाराज शास्त्र्ााr, नाथा घुले, स्वाती मोराळे, पुष्पा पानसरे, संभाजी पाटील, राजेंद्र डोईफोडे, रत्नाकर मोढवे, गोविंद घोळवे उपस्थित होते.

‘ओबीसी संघर्षाला खऱया अर्थाने 1990 साली सुरुवात झाली. गोपीनाथ मुंडे, अण्णा डांगे, ना. स. फरांदे यांनी या विषयाला वाचा फोडली. आज ओबीसी समाज एकत्र आला पाहिजे. ओबीसीमध्ये 350 जाती आहेत. त्या वेळेला हे काम अवघड होते. अनेक इगो होते पण मुंडेंनी पुढाकार घेतला आणि ओबीसी चळवळ सुरू झाली. सध्या आरक्षणाचा विषय सुरू झाला आहे, मात्र फेरजनगणना झाल्यानंतरच हा प्रश्न सुटू शकतो’ असे खडसे यांनी सांगितले.

मी बोलतच राहणार!
‘मी बोलतच राहणार. माझे काय चुकले हे अगोदर सांगा. न केलेल्या गुह्याची शिक्षा मी भोगतोय’ असे सांगत खडसे म्हणाले, ‘लोकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. प्रश्न सोडविणार नसला तर नेता कोण राहणार? शांत बसलो तर घातक आहे. मंत्रीपदापेक्षा मला समाज मोठा आहे’ असे त्यांनी सांगितले. ‘मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, याबाबत दुमत नाही, मात्र 16 टक्के आरक्षण देऊन त्यांना ‘कुणबी’ जाहीर करा असे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे म्हणाले होते. सर्वांना ‘कुणबी’ जाहीर केले तर ते ओबीसीत येतील. ते कसे चालेल’ असे सांगून खडसे म्हणाले, ‘ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावे. कोणाचेही आरक्षण हिरावून घेता कामा नये. ओबीसी आरक्षणाला धक्का लागता कामा नये. तसे झाल्यास आमच्या सरकारला जाब विचारणारा मी पहिला माणूस असेन’ असा इशारा त्यांनी दिला. दरम्यान, ‘सरकारकडे आरक्षणाची आकडेवारी आहे का? वास्तविक जातीनिहाय फेरजनगणना झाली तरच ओबीसी किती आहेत हे लक्षात येईल. जनगणना झाल्यावर कोणाला काय आरक्षण द्यायचे ते तुम्ही द्या’ असे ते म्हणाले.