दाखल्यांसाठी खालापुरातील विद्यार्थ्यांची फरफट, सेतू कार्यालयाचा सर्व्हर डाऊन

सेतू कार्यालयातील सर्व्हर अचानक डाऊन झाल्याने खालापूरमधील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह ज्येष्ठ नागरिकांची पंचायत झाली. महाविद्यालयाची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून त्यासाठी लागणारे दाखले उपलब्ध करण्यासाठी विद्यार्थ्यांनी सेतू कार्यालयात गर्दी केली होती. मात्र सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने दाखले मिळवण्यासाठी पालकांसह विद्यार्थ्यांची चांगलीच फरफट झाली. वारंवार होणाऱ्या सर्व्हर डाऊनच्या समस्येमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

महा ई सेवा केंद्रांच्या माध्यमातून रहिवास प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र यांसह 7/12 चा उतारा, उत्पन्नाचा दाखला असे विविध परवाने, दाखले व प्रमाणपत्र सेतू विभागातून ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध होतात. त्यातच आता महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची प्रक्रिया सुरू असल्याने या केंद्रावर प्रचंड गर्दी होते. मात्र वारंवार सर्व्हर डाऊन होत असल्याने लांबच लांब रांगा लागतात. काहींना एक दाखला मिळवण्यासाठी दररोज फेऱ्या माराव्या लागत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातून आलेले नागरिक, वृद्ध, महिला, पालक व विद्यार्थ्यांची तासन्तास ताटकळत उभे राहावे लागत आहे.

सरकारी सेवांचा बोजवारा
वारंवार होणाऱ्या सर्व्हर डाऊनमुळे दाखल्यांची ऑनलाइन प्रक्रिया विस्कळीत झाली आहे. त्यामुळे सेतू कार्यालयातील महा ई सेवा केंद्रामधून मिळणाऱ्या सरकारी सेवांचा बोजवाराच उडाला आहे. त्यामुळे लवकरात लवकर ही सेवा सुरू करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. सरकारकडून कोट्यवधी रुपये खर्च करून सुरू केलेल्या केंद्राचा लाभ मिळत नसेल तर त्याचा फायदा काय, असा प्रश्न संतप्त नागरिकांनी उपस्थित केला आहे.