नाइलाजाने राजकारणात आल्या अन् ‘आयर्न लेडी’ ठरल्या!

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा झिया यांचे राजकीय आयुष्य संघर्षमय होते. पतीच्या हत्येनंतर नाइलाजाने राजकारणात उतरलेल्या खालिदा यांनी अल्पावधीतच राजकीय बस्तान बसवले. बांगलादेशातील लष्करी उठावाला विरोध करत लढा देणाऱया खालिदा कालांतराने बांगलादेशच्या ‘आयर्न लेडी’ ठरल्या.

बांगलादेश स्वातंत्र्य युद्धाच्या काळात खालिदा यांना तुरुंगवास भोगावा लागला होता, मात्र राजकारणापासून त्या लांब होत्या. त्यांचे पती झियाउर रहमान हे बांगलादेशचे राष्ट्राध्यक्ष होते. त्या काळात खालिदा केवळ गृहिणी होत्या. 1981 साली देशात झालेल्या लष्करी उठावात त्यांच्या पतीची हत्या करण्यात आली. त्यामुळे झियाउर रहमान यांचा बीएनपी हा पक्ष नेतृत्वहीन झाला. तो पक्ष विखुरण्याच्या मार्गावर होता. त्यामुळे नेते व कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव त्यांनी पक्षाचे नेतृत्व स्वीकारले.

खालिदा राजकारणात आल्यानंतर काही महिन्यांतच देशात पुन्हा लष्करी उठाव झाला. खालिदा यांनी सर्वशक्तिनिशी त्यास विरोध केला व लष्कराच्या आदेशाने झालेल्या निवडणुकीवर बहिष्कार टाकला. देशात लोकशाहीच्या स्थापनेसाठी लढा दिला. त्यामुळे त्यांना ‘अपोशहीन नेत्री’ (तडजोड न करणाऱ्या नेत्या) अशी ओळख मिळाली. कालांतराने 1991 मध्ये त्या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान झाल्या.

शेख हसीना भावुक
खालिदा झिया यांच्या निधनाबद्दल राजकारणातील त्यांच्या कट्टर प्रतिस्पर्धी व सध्या हिंदुस्थानच्या आश्रयाला असलेल्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी तीव्र दुःख व्यक्त केले. ‘खालिदा यांच्या निधनामुळे देशाच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे,’ अशी भावना हसीना यांनी व्यक्त केली. बांगलादेशच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून खालिदा झिया यांनी देशासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. लोकशाहीच्या लढय़ातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. खालिदा यांच्या निधनामुळे केवळ बांगलादेशच्या राजकारणाचेच नव्हे तर बांगलादेश नॅशनल पार्टीचेही मोठे नुकसान झाले आहे, असे हसीना म्हणाल्या.

हिंदुस्थानविरोधी भूमिका
पंतप्रधान म्हणून खालिदा यांनी हिंदुस्थानच्या बाबतीत नेहमीच संघर्षाची भूमिका घेतली होती. हिंदुस्थानच्या ईशान्येकडील राज्यांत प्रवेशासाठी बांगलादेशी भूमीतून रस्ता देण्यास खालिदा यांनी विरोध केला होता. यामुळे बांगलादेशची सुरक्षा धोक्यात येईल अशी त्यांची भूमिका होती. 1972 चा हिंदुस्थान-बांगलादेश मैत्री करार पुढे सुरू ठेवण्यासही त्यांचा विरोध होता. आमचा पक्ष बांगलादेशला हिंदुस्थानी वर्चस्वापासून वाचवण्याचे काम करत आहे. बांगलादेशला ‘हिंदुस्थानचे राज्य’ बनू दिले जाणार नाही, अशी जाहीर भूमिका त्यांनी घेतली होती. हिंदुस्थानवर दबाव आणण्यासाठी त्यांनी चीनशी जवळीकही साधली होती. मनमोहन सिंग यांच्या सरकारच्या काळात 2012 मध्ये त्यांचा हिंदुस्थानविरोध काही प्रमाणात मावळला होता. त्यांनी हिंदुस्थान दौराही केला होता.

परराष्ट्र मंत्री जयशंकर अंत्यसंस्काराला उपस्थित राहणार
खालिदा झिया यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले आहे. बांगलादेशच्या विकासात व हिंदुस्थान-बांगलादेश संबंध दृढ करण्यात त्यांनी दिलेले योगदान कायम स्मरणात राहील, असे मोदी म्हणाले. हिंदुस्थानचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हे झिया यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहण्यासाठी ढाक्याला जाणार आहेत.