
कोरोनाबाधित रुग्णांना ऑक्सिजनची जाणवणारी कमतरता दूर करण्यासाठी ऑक्सिजन सिलिंडर देण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले होते. त्याला खटाव तालुक्यातील उद्योजक तसेच लहान-मोठय़ा फॅब्रिकेशन व्यावसायिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यामुळे एका दिवसात तब्बल 50 ऑक्सिजन सिलिंडर जमा झाले आहेत.
खटाव तालुक्यात सध्या कोरोनाबाधितांची संख्या झपाटय़ाने वाढू लागली आहे. तालुक्यातील वडूज, औंध, खटाव, पुसेगाव, कातरखटाव, सातेवाडी आदी ठिकाणी आयसोलेशन सेंटर सुरू झाली आहेत. या ठिकाणी काही ऑक्सिजन बेड उपलब्धही करण्यात आले आहेत. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांना जाणवणारी ऑक्सिजन बेडची अडचण दूर होण्यास मदतही झाली आहे. मात्र, आयसोलेशन सेंटर व त्यामधील रुग्णसंख्या व त्यांना लागणारा ऑक्सिजन यामुळे ऑक्सिजन सिलिंडरचीच मोठी कमतरता जाणवत होती. त्यावर प्रशासनाने तालुक्यातील उद्योजक, लहान-मोठे फॅब्रिकेशन व्यावसायिक यांना त्यांच्याकडील ऑक्सिजन सिलिंडर देण्याचे आवाहन केले. त्यानुसार प्रांताधिकारी जनार्दन कासार यांच्या मार्गदर्शनाखाली हे ऑक्सिजन सिलिंडर जमा करण्याची मोहीम राबविली.
तहसीलदार किरण जमदाडे, गटविकास अधिकारी रमेश काळे, नायब तहसीलदार सीताकांत शिर्के, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. युनूस शेख, डॉ. संतोष मोरे, डॉ. सम्राट भादुले तसेच मंडलाधिकारी, गावकामगार तलाठी यांनी याकामी योगदान दिले. आरोग्य विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱयांनी या सिलिंडरची पाहणी व सुरक्षिततेची खातरजमा करून त्याचे सेफ्टी ऑडिट करून त्याचे प्रमाणपत्र दिले
खटाव तालुक्यात कोरोनाची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा प्रसंगात ऑक्सिजन सिलिंडरसाठी तहसीलदार किरण जमदाडे यांच्याकडून विचारणा करण्यात आली. त्यावेळी आपण तातडीने कारखान्यावरील 20 सिलिंडर उपलब्ध करून दिले.
– प्रभाकर घार्गे, माजी आमदार..


































































