
खाटीक समाजाचे जीवन म्हणजे अत्यंत खडतर. पण त्यातूनही हा समाज आपल्या नव्या पिढीला चांगले शिक्षण देऊन समाजात मानाचे स्थान मिळवू लागला आहे. भाईंदर येथील फारूख इस्माईल पुरेशी यांची कन्या अफशा ही पायलट बनली आहे. अफशा ही मुस्लिम खाटीक समाजातील देशातील पहिली महिला पायलट ठरली आहे.
अफशा हिचे शिक्षण मुंबईत झाले. अफशाचे पायलट होण्याचे स्वप्न होते. इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलि-कम्युनिकेशन इंजिनियर बनल्यानंतर तिने कमर्शियल पायलट लायसेन्सचा अभ्यासक्रम अमेरिकेतून पूर्ण केला. परदेशात नोकरी मिळत होती पण अफशाने आपल्या मातृभूमीलाच प्राधान्य दिले. देशात राहूनच देशसेवा करण्याची इच्छा तिने व्यक्त केली आहे. कुटुंबीय आणि गुरूंचा आपल्या यशात मोठा वाटा आहे असे सांगतानाच अफशाने वडिलांनी दाखवलेला विश्वास आणि प्रेम आपल्याला हे यश गाठण्यास उपयुक्त ठरल्याचे अभिमानाने सांगितले.



























































