अय्यंगार बेकरीत बुरशीजन्य खाद्यपदार्थांची विक्री

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

खेड शहरातील शिवाजी चौक परिसरात असलेल्या अय्यंगार बेकरीत बुरशी आलेल्या खाद्य पदार्थांची विक्री केली जात असल्याची बाब उघड झाल्याने बेकरी व स्वीट मार्टमधील पदार्थांच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान, खेड शिवसेना शहर प्रमुख निकेतन पाटणे यांनी केलेल्या तक्रारीनुसार अन्न व औषध प्रशासनाने अय्यंगार बेकरीला सील ठोकले आहे.

शिवाजी चौक येथील अय्यंगार बेकरीत बुरशीजन्य पदार्थ विक्रीसाठी ठेवले असल्याची तक्रार शिवसेना शहर प्रमुख निकेतन पाटणे यांच्याकडे आली होती. त्यानंतर पाटाने यांनी तात्काळ बेकरीत जाऊन तेथील पदार्थांची पाहणी केली. तक्रारीत तथ्य असल्याचे स्पष्ट झाल्याने पाटणे यांनी बेकरी चालकाला चांगलेच धारेवर धरले. आरोग्याला अपाय करणारे पदार्थ विकून नागरिकांच्या जीविताशी खेळण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला असा जाब या परप्रांतीय बेकरी चालकाला विचारण्यात आला. मात्र यावर बेकरी चालकाकडे काहीच उत्तर नव्हते.

बेकरीमध्ये विकल्या जाणाऱ्या खाद्य पदार्थांना बुरशी येणे ही बाब चिंताजनक आणि गंभीर असल्याने पाटणे यांनी खेड नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे याना याबाबाबत माहिती दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून मुख्याधिकारी शिंगटे व स्वच्छता निरीक्षक महेंद्र शिरगावकर आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. स्वच्छता निरीक्षक महेंद्र शिरगावकर यांनी बेकरीचे तपासणी केली असता त्यांना तेथील खाद्य पदार्थाना बुरशी आल्याचे आढळून आले. त्यांनी हे सर्व पदार्थ जप्त करून अयंगार बेकरीला सील ठोकले.

बुरशी आलेले खाद्य पदार्थ खाल्ल्यामुळे विषबाधा होण्याची शक्यता असल्याने नगरपालिका प्रशासनाने याबाबत रत्नागिरी येथे अन्न व औषध प्रशासनाशी संपर्क साधला. नगरपालिका प्रशासनाने केलेल्या तक्रारीची दखल घेत अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी काही तासातच खेड येथे दाखल झाले. या अधिकाऱ्यांनी बेकरीतील पदार्थ ताब्यात घेतले असून बेकरी चालका विरुद्ध कारवाई सुरू केली आहे. खेड शहरातील बेकरी व स्वीट मार्टमध्ये या आधीही असे प्रकार घडले आहेत. एक दोन वेळेस बेकरीतील ढोकळा, सामोसे, असे पदार्थ खाल्ल्याने उलट्या जुलाब होण्याच्या घटना घडल्या आहेत. काही वर्षांपूर्वी बेकरीतील भाकरवडीमध्ये रबर मिळाला होता. बेकऱ्यांमधील भटारखान्यात तर मोठ्या प्रमाणात अस्वच्छता असल्याचे बोलले जात आहे. मात्र जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्या बेकरी चालकांविरोधात ठोस कारवाई होत नसल्याने असे प्रकार वारंवार घडत आहेत.