खेड शहरातील अनधिकृत गाळे होणार जमीनदोस्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

खेड नगरपरिषदेची कुठलीही परवानगी न घेताच रातोरात अनधिकृतपणे उभ्या राहिलेल्या खोक्यांवर गणेशोत्सवानंतर कारवाई करण्याचे संकेत नगर पालिका प्रशासनाने दिले असल्याने अनधिकृत गाळे उभारणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. अनधिकृत गाळ्यांचा प्रश्न दैनिक सामनाने लावून धरला होता. प्रसारमाध्यमांच्या रेट्यानानंतर नगरपरिषद प्रशासनाने अनधिकृत गाळ्यांवर कारवाई करण्याच्या निर्णय घेतला असल्याने या कारवाईदरम्यान नव्या-जुन्या खोक्यांचा वादही उफाळून येण्याची शक्यता आहे.

खेड नगरपालिका हद्दीत कोणतेही बांधकाम करायचे असेल तर नगरपालिका प्रशासनाची पूर्व परवानगी घेणे आवश्यक असते मात्र खेड नगरपालिका याला अपवाद आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये खेड नगरपालिका हद्दीतील शासकीय जागेवर अनेक व्यावसायिक गाळे उभे राहिले, काही ठिकाणी तर रातोरात गाळे उभे करण्यात आले. या अनधिकृत व्यावसायिक गाळ्यांमुळे शहराची प्रतिमा डागाळली गेली असून खेड शहराची ओळख अनधिकृत गाळ्यांचे शहर अशी झाली आहे.

नगरपालिका प्रशासनाची कोणतीही परवानगी न घेता मोकळ्या शासकीय जागांवर अनधिकृत गाळे उभारून चुकीचा पायंडा पडला आहे. खरतर नगरपालिका प्रशासनाने अशा अनधिकृत गाळ्यांवर तात्काळ कारवाई करणे अपेक्षित होते. मात्र गाळे उभारून काही महिने लोटले तरी नगरपालिका प्रशासन केवळ कारवाईचे कागदी घोडे नाचवत बसले असल्याने खेडच्या जनतेतून आश्चर्य व्यक्त होत आहे.

खेड एसटी स्थानकाच्या मागील बाजूला असलेल्या सुपरमार्केट परिसरात एकामागोमाग काही अनधिकृत गाळे उभे राहिले, खेड-भरणे मार्गावर असलेल्या पंचायत समिती कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळील मोकळ्या जागेवर दोन, नगर वाचनालयासमोर आणि खांबतळेनजीक प्रत्येकी एक खोका उभारला आहे. यासाठी नगर प्रशासनाची कुठलीही परवानगी घेण्यात आलेली नाही. त्यामुळे अनधिकृत गाळे उभे करणारे नगरपालिका नियमांचा भंग करत आहेत. नगरपालिका नियमांचा भंग करणाऱ्यांवर त्या त्या वेळेत कारवाई झाली असती तर पुढच्यास ठेच मागचा शहाणा झाला असता मात्र नगरपालिका प्रशासनाने कारवाई करण्यास दिरंगाई केल्याने त्याने अनधिकृत गाळा उभा केला मग मी का करू नये अशी मानसिकता तयार होऊ लागली आहे.

सद्यस्थितीत खेड नगरपालिकेला मुख्याधिकारी नाही, येथील मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांची चिपळूण येथे बदली झाल्यानंतर खेड नगरपालिकेचा पदभार दापोली नगरपंचायतीचे मुख्याधिकारी महादेव रोडगे यांच्याकडे सोपविण्यात आला होता.. पूर्वी महादेव रोडगे यांनी खेड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी म्हणून कारभार सांभाळला होता. त्यामुळे त्यांना इथले राजकारण, इथल्या लोकांची मानसिकता चांगलीच माहित होती. अनधिकृत गाळ्यांवर आज कारवाई केली नाही तर उद्या शहरात अनेक गाळे उभे राहतील याची रोडगे यांना कल्पना असल्याने त्यांनी गणेशोत्सवानंतर अनधिकृत गाळ्यांवर बुलडोझर फिरवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता महादेव रोडगे यांचीही दापोली येथून बदली होऊन त्यांच्या जागी दयानंद ढेकळे आले आहेत खेड नगरपालिकेचा चार्जही दयानंद ढेकळे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. मात्र नवनिर्वाचित मुख्याधिकारी ढेकळे अनधिकृत गाळ्यांवर कारवाई करण्याबाबत काय निर्णय घेतात याकडे खेडच्या जनतेचे लक्ष लागून राहिले आहे.