
गणेशोत्सवासाठी कोकणात आलेले चाकरमानी गौरी-गणपतींचे विसर्जन होताच परतीच्या प्रवासाला निघाले असल्याने महामार्गावर वाहनांची वर्दळ वाढली आहे. पावसामुळे महामार्गावर पडलेले खड्डे चुकविताना चालकांना तारेवरची कसरत करावी लागत असल्याने आज सकाळी महामार्गावरील जगबुडी पुलावर वाहनांची कोंडी झालेले पहावयास मिळत होती.
यावर्षीच्या गणेशोत्सवावर कोरोनाचे संकट असतानाही ई-पास, मेडिकल तपासणी, वारंटाईन, हे अडथळे पार करून लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी अनेक चाकरमानी आपल्या कुटुंबासह कोकणात दाखल झाले होते. कोरोनाच्या संकटावर मात करत गणेशोत्सव साजरा करून गौरी-गणपतींना निरोप दिल्यानंतर चाकरमानी पुन्हा आपल्या नोकरीच्या ठिकाणी रुजू व्हायला निघाले आहेत. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभुमीवर गेले काही महिने शुकशुकाट असलेल्या महामार्गावरील वाहनांची वर्दळ पुन्हा एकदा वाढली आहे. गेले काही दिवस कोसळत असलेल्या पावसामुळे महामार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहने हाकताना वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
खड्डयांमुळे वाहनांच्या वेगालाही ब्रेक लागत असल्याने ठिकठिकाणी वाहतुकीची कोंडी होत असल्याचे चित्र आहे. महामार्गावरील भरणे नाका येथील जगबुडी पुलाच्या जोडरस्त्यालाही खड्डे पडले असल्याने या ठिकाणी वाहने हाकताना चालकांचा कस लागत आहे. जुगबुडी पुलाच्या जोडरस्त्याला पडलेले खड्डे बुजवताना आज सकाळी या ठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली होती.
ठेकेदाराविरोधात स्थानिक आक्रमक
वर्दळीच्या दरम्यान जगबुडी पुलावर होणारी वाहतुकीची कोंडी लक्षात घेत या ठिकाणी पडलेले खड्डे संबधित ठेकेदार कंपनीने बुजविणे आवश्यक होते. मात्र रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविण्याबाबत ठेकेदारानी दाखविलेल्या उदासिनतेमुळे महामार्गावरील जगबुडी पुलावर वाहतुकीची कोंडी होताना दिसत आहे. जोडरस्त्यावर पडलेल्या खड्डे आणि रस्त्यावर वाढलेली वाहनांची वर्दळ यामुळे या ठिकाणी अपघाताची शक्यता नाकारता येत नसल्याने महामार्ग विभागाच्या अधिकायांनी जगबुडी पुलाच्या जोडरस्त्याला पडलेले खड्डे संबधित ठेदेकाराकडून तात्काळ बुजवून घ्यावेत अशी मागणी चालक आणि प्रवाशांनी केली आहे.



























































