थरारक… एक तास मृत्यूशी झुंज! नारिंगी नदीच्या महापुरात 80 शेतकऱ्यांना वाचवले!

467

सूर्य मावळतीला चालला होता आणि अजून चार कोपऱ्यांत भात लावणी करायची बाकी होती. अंधार पडायच्या आत लावणी उरकायला हवी असे म्हणत प्रत्येकाचेच हात भिजलेल्या मातीत रुतत होते. इतक्यात कुणीतरी हाळी दिली… ‘अरे, नदीचा पानी शेतात घुसलंय, सांभाळा.’ हाळी देणारा नेमके काय बोलला हे समजायच्या आत पाण्याचा अजस्र लोट शेतात घुसला आणि सुमारे 80 शेतकरी या महापुराच्या पाण्यात अडकून पडले. तब्बल एक तासाचा तो थरार… मदतीसाठी आरडाओरडा झाला तेव्हा गावातील तरुणांनी धाव घेतली आणि मानवी साखळी करून या 80 जणांना सुखरूप बाहेर काढले. नारिंगी नदी कोपली, पण नशीब बलवत्तर ठरले.

गेल्या तीन दिवसांपासून अवघ्या कोकणात तुफान पाऊस कोसळत आहे. शनिवारी खेडमध्ये तर हाहाकारच उडाला. चिंचघर आणि चाकाळे या दोन गावांमधून वाहणाऱ्या नारिंगी नदीला अचानक पूर आल्याने नदीकिनारी असलेल्या शेतामध्ये पाणी घुसले. शेतात लावणी करायला गेलेले शेतकरी या पुरात अडकले.

सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली. लावणी करत असलेले शेतकरी बांधावरच अडकून पडले. गावातील तरुणांना याची माहिती मिळताच त्यांनी शेताच्या दिशेने धाव घेतली. मानवी साखळी करत दोरखंडाच्या सहाय्याने पुराच्या पाण्यात अडकलेल्या 80 जणांची सुखरूप सुटका केली. त्यात महिलांचाही समावेश होता.

शेतीचे अतोनात नुकसान, पण…

चाकाळे गावातील हा थरार एक तास सुरू होता. पुराच्या पाण्यामुळे लावलेल्या भातशेतीचे अतोनात नुकसान झाले, नांगर वाहून गेले, पण जीव वाचला हे महत्त्वाचे. नाहीतर शनिवारची नोंद खेड तालुक्याच्या इतिहासात काळा शनिवार म्हणून झाली असती.

आपली प्रतिक्रिया द्या