
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने जाहीर केलेल्या विकेंड लॉक डाउनला खेडमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पोलीस कारवाईच्या भीतीने अनेकांनी घरीच बसने पसंत केल्याने खेड शहरामध्ये शुकशुकाट पाहावयास मिळाला. दुकानदारांनीही आपापली दुकाने बंद ठेवून विकेंड लॉक डाउनला पाठिंबा दर्शवला त्यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने जाहीर केलेल्या लॉकडाऊनला खेड शहरात चांगला प्रतिसाद मिळाला.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने राज्यात थैमान घातले आहे. ही लाट रोखण्यासाठी शासनाने शुक्रवार रात्री 8 ते सोमवारी सकाळी 7 या दरम्यान कडक लॉक डाउन जाहीर केला आहे. या शिवाय अन्य दिवशीही अत्यावश्यक सेवा वगळता अन्य आस्थापने बंद ठेवण्याचे निर्देश शासनाकडून देण्यात आले आहेत.
या पार्श्वभूमीवर 6 एप्रिल पासून खेड शहरात बंद सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. दुकाने बंद ठेवण्यावरून व्यापारी आणि शासकीय यंत्रणा यांच्यामध्ये वादावादीही होत आहे. गेल्या दोन दिवसात पोलिसांनी काही दुकानदारांवर दुकाने उघडी ठेवून कोरोना नियमांचा भंग केल्या प्रकरणी गुन्हे देखील दाखल केले आहेत.
पोलिसांच्या या कारवाईमुळे शासनाच्या विकेंड लॉक डाउनला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. पोलिसांनी आधीच व्यापारी आणि नागरिकांना कारवाईचे संकेत दिले होते. त्यामुळे कोरोना नियमांचा भंग झाल्यास कारवाई अटळ आहे हे व्यापारी आणि नागरिकांना कळून चुकल्याने आजचा विकेंड लॉक डाउन अपेक्षापेक्षाही यशस्वी झालेला आहे.
शहरातील एकही दुकानदाराने आपले दुकान उघडले नव्हते. ग्रामीण भागातून शहरात खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांनीही घरीच राहणे पसंत केले होते त्यामुळे नेहमी गजबजली बाजारपेठ, एसटी बस स्थानक तीनबत्ती नका परिसर, निवासाचा चौक, शिवाजी महाराज चौक, भरणे नाका या ठिकाणी निरव शांतता पहावयास मिळाली. ठिकठिकाणी पोलीस मात्र बंदोबस्तास असलेले पहावयास मिळत होते.


























































