किल्लारी कारखान्याची तज्ज्ञांकडून पाहणी, याच हंगामात कारखाना सुरू होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । किल्लारी

औसा तालुक्यातील किल्लारी येथील शेतकरी सहकारी साखर कारखान्याची तज्ज्ञांकडून पाहणी करण्यात आली आहे. कारखान्यातील मशिनरीची डागडुजीचे काम तसेच परिसर साफसफाई करून किल्लारी साखर कारखाना याच हंगामात सुरू करण्याचा विश्वास अवसायक चेअरमन संताजी चालुक्य यांनी व्यक्त केला आहे. गेल्या काही वर्षांपासून शिखर बँकेच्या कर्जामुळे किल्लारी कारखाना बंद असल्यामुळे औसासह निलंगा तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा ऊस गाळप होत नाही. पर्यायाने ऊस गाळपासाठी शेतकऱ्यांना अधिकचा वाहतूक खर्च करून दुसऱ्या ठिकाणी जावे लागते. यासाठी अन्य कारखान्यांना गाळपासाठी ऊस द्यावा लागतो.

किल्लारी येथील शेतकरी सहकारी साखर कारखानी प्रथमेश संस्थेला 20 वर्ष करारावरच्या भाडेतत्त्वावर देण्यात आला आहे. कारखाना याच हंगामात सुरू करण्याच्या उद्देशाने प्रथमेश संस्थेचे तज्ज्ञ अधिकारी वर्ग आणि अवसायक चेरमन संताजी चालुक्य, रमेश माने, वारणा ग्रुपचे अधिकारी महेश गुप्ता, विजय मराठे आणि तज्ञांनी कारखान्याची पाहणी केली. यावेळी जि. प. सदस्य महेश पाटील, काकासाहेब मोरे, संतोष मुक्ता, रमेश माने, गणेश माने, रामकिरण साठे आदी उपस्थित होते.