
पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात धावत्या ट्रेनने गुरुवारी सकाळी पेट घेतल्याने त्यातून प्रवास करणाऱया 73 प्रवाशांचा मृत्यू झाला, तर अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये लाहोरला जाणाऱ्या अनेक मुस्लिम धर्मप्रचारकांचा समावेश आहे. हे सर्व कराची-रावळपिंडी तेजगाम एक्स्प्रेसने एका धार्मिक मेळाव्यासाठी लाहोरला जात होते. त्यातील बहुतांश मुस्लिम तबलिगी जमातीचे आहेत. पंतप्रधान इम्रान खान यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त करीत जखमी प्रवाशांना आवश्यक मदत तत्काळ पुरवण्याचे आदेश दिले आहेत.
तेजगाम एक्स्प्रेसच्या आगीत या गाडीचे तीन डबे जळून खाक झाले. त्यातून सुमारे 200 प्रवासी प्रवास करीत होते. त्यात महिला आणि मुलांचाही समावेश आहे. लाहोरपासून 400 किमी अंतरावर एक्स्प्रेसच्या एका डब्यात नाश्त्यासाठी पेटवण्यात आलेल्या गॅस स्टोव्हचा स्फोट होऊन आग भडकली. त्यामुळे वेगाने धावणाऱया ट्रेनमधील प्रवाशांची मोठी धांदल उडाली. अनेकांनी आगीपासून वाचण्यासाठी धावत्या गाडीतून उडय़ा मारल्या आणि प्राण गमावले, तर 65 जण आगीत होरपळून ठार झाले. या भीषण आगीत गंभीररीत्या भाजलेल्या जखमींची संख्या मोठी आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
आग गॅस स्टोव्हने नाही, शॉर्टसर्किटने
तबलिगी प्रचारकांच्या दावा पाकिस्तानचे रेल्वेमंत्री शेख यांचा दावा या दुर्घटनाग्रस्त ट्रेनमधून प्रवास करणाऱया तबलिगी प्रचारकांनी फेटाळून लावला. आग गॅस स्टोव्हच्या स्फोटाने नव्हे तर ट्रेनमधील शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा दावा त्यांनी केला. लियाकतपूर नजीकच्या रहीम यार खान येथे लागलेल्या आगीनंतर ट्रेन पुढे थांबवण्यात आली. 10 अग्निशमन बंबांनी अनेक तासांच्या झुंजीनंतर ही आग आटोक्यात आणली, पण तोपर्यंत एक्स्प्रेसचे तीन डबे जळून खाक झाले होते. लष्कराच्या हेलिकॉप्टर्सनी जळालेल्या प्रवाशांचे मृतदेह आणि जखमींना रुग्णालयात हलवले. अनेक मृतदेहांचा आगीत जळून पार कोळसा झाल्याने डीएनए चाचणीने अनेक मृतांची ओळख पटवली जाणार आहे.
जेवण शिजवताना सिलिंडरचा स्फोट
ट्रेनच्या डब्यातच काही प्रवासी छोटय़ा गॅस स्टोव्हवर जेवण शिजवत असताना स्टोव्हचा भीषण स्फोट घडून गाडीच्या डब्याने पेट घेतला आणि त्यातील अनेक प्रवाशांनी आगीच्या भीतीने जीव वाचवण्यासाठी चालत्या गाडीतून उडय़ा मारल्या आणि प्राण गमावले, तर अनेक जण आगीत होरपळून मरण पावले, अशी माहिती पाकिस्तानचे रेल्वेमंत्री शेख रशीद यांनी दिली.




























































