
साधारणतः कोणत्याही प्रसिद्ध व्यक्तिच्या सार्वजनिक जीवनाइतकीच चर्चा त्याच्या खासगी जीवनाविषयी होत असते. त्यांच्या खासगी जीवनाबाबत अनेक किस्से-कहाण्या रंगवल्या जातात, चवीचवीने चघळल्याही जातात. विशेष म्हणजे, या नियमाला क्रूर वर्तणुकीमुळे कुप्रसिद्ध झालेले हुकुमशहासुद्धा अपवाद नाहीत. जर्मनीचा हुकुमशहा हिटलर देखील त्याच्या राजकीय कारकिर्दीइतकाच त्याच्या इव्हा ब्राऊन या प्रेयसीसोबतच्या नात्यामुळे चर्चिला गेला होता.
हे सगळं सांगायचं कारण म्हणजे सध्या उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जोंग उन याच्या प्रकृतिविषयी येणारी वृत्तं. किम जोंग उन हा त्याच्या नुकत्या झालेल्या तथाकथित कार्डिओवस्कुलर शस्त्रक्रियेमुळे चर्चेत आला आहे. मात्र, अशी काही शस्त्रक्रिया झाल्याची अधिकृत माहिती उत्तर कोरियाने दिलेली नाही. पण या निमित्ताने पुन्हा एकदा किम जोंगच्या खासगी जीवनाची चर्चा होऊ लागली आहे. विशेषतः त्याच्या लव्हस्टोरीची. खरंतर, या जगाने आतापर्यंत अनेक हुकुमशहा पाहिले आहेत. त्यांच्या क्रूरतेच्या कहाण्या ऐकल्या आहेत. किम जोंग उनच्या क्रूरतेच्या कहाण्या तर ऐकणाऱ्याच्या जीवाचा थरकाप उडवतात. इतक्या लहरी आणि संतापी माणसावर कुणी प्रेम करू शकेल का? त्याला कुणावर प्रेम करावं, अशा कोमल भावना असतील का? तर या प्रश्नांचं उत्तर आहे हो. किम जोंग उन हा उत्तर कोरियाचा हुकुमशहा होण्याआधी एका तरुणीच्या प्रेमात पडला होता.

ही गोष्ट असेल साधारण 2008 दरम्यानची. किम जोंग उन याने एका ऑर्केस्ट्रा कार्यक्रमाला भेट दिली होती. तेव्हा तो तत्कालिन हुकुमशहा किम जोंग उल यांचा राजकीय उत्तराधिकारी म्हणवला जात होता. त्या ऑर्केस्ट्रामध्ये गाणाऱ्या एका तरुणीला किमने पाहिलं आणि त्याला ती तरुणी आवडली. त्या तरुणीसोबत जेव्हा त्याची भेट झाली, तेव्हा पहिल्या भेटीतच तो तिच्या आकंठ प्रेमात पडला. त्या तरुणीचं नाव आहे रि सोल जू.

रि सोल जू हिचे वडील उत्तर कोरियात प्राध्यापक होते आणि तिची आई डॉक्टर. ती एका मध्यमवर्गीय कुटूंबातून आली होती. ती शाळा आणि कॉलेजमधे वेगवेगळ्या अॅक्टिविटीमधे भाग घेत होती. त्यानुसार दक्षिण कोरियात 2005 मधे होणाऱ्या एशियन एथलेटिक चॅम्पियनशिपसाठी उत्तर कोरियात चीअरलीडर निवडल्या जात होत्या. त्यात रि सोल ची सुद्धा निवड झाली होती. कॉलेजचं शिक्षण पूर्ण केल्यावर ती चीनमध्ये संगीत शिकण्यासाठी गेली होती. तिथून परतल्यावर तिला खरंतर अभ्यासात लक्ष द्यायचं होतं. पण, ती इतकं चांगलं गात होती की, देशातील सर्वात लोकप्रिय ऑर्केस्ट्रामध्ये तिला गायची संधी मिळाली. अनेक देशांमध्ये त्यांचे शो होत होते. ती देशातील लोकप्रिय गायिका झाली होती. अशाच एका कार्यक्रमाला किम जोंग उनने तिला पाहिलं आणि तिच्या प्रेमात पडला.
हेही- 21व्या शतकातला हिटलरचा अवतार; किम जोंगचे ‘हे’ क्रूर किस्से वाचून तुम्हीही हेच म्हणाल

रि सोल जू देखील किमच्या प्रेमात पडली होती. त्यांच्या प्रेमकथेची परिणती 2009मध्ये विवाहात झाली. असं म्हणतात की, वर्षभरात त्यांना मुलगाही झाला. 2011मध्ये किम जोंग उन उत्तर कोरियाचा हुकुमशहा बनल्यानंतर रि सोल जू ही उत्तर कोरियाची फर्स्ट लेडी झाली. आज त्यांच्या विवाहाला 11 वर्षं पूर्ण झाली आहेत आणि त्यांना तीन अपत्यं आहेत.
किम जोंग उनची लव्हस्टोरी अनेक अर्थांनी खास आहे. कारण, तो एखाद्या राजपुत्रासारखं जीवन जगत होता आणि ती एखाद्या सामान्य मुलीसारखं. किम जोंग उनचे वडील आणि आजोबा यांचे अनेक विवाह झाले होते आणि त्याखेरीजही त्यांचे अनेक स्त्रियांशी विवाहबाह्य संबंधही होते. मात्र, किम जोंग उनने एकच विवाह केला आहे. यावरूनच तो रि सोल जू हिच्या प्रेमात असल्याची खात्री पटते. त्यांची केमिस्ट्री पाहणारे अनेकजण ते एकमेकांच्या प्रेमात आजही तितकेच आकंठ बुडालेले असल्याचं सांगतात.

























































