
कादंबरीकार आणि नाटककार किरण नगरकर यांचे गुरुवारी रात्री ब्रेन हॅमरेजने मुंबई रुग्णालयात निधन झाले. नगरकर यांच्या पार्थिवावर त्यांच्या इच्छेप्रमाणे शुक्रवारी चंदनवाडी येथील विद्युतदाहिनीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे परदेशात वास्तव्यास असलेले बंधू परतल्यानंतर सायंकाळी अंत्यविधी झाले. यावेळी नगरकर यांचे कुटुंबीय आणि निकटवर्तीय अशी मोजकीच मंडळी यावेळी उपस्थित होती. नगरकर यांच्या निधनाने अस्तित्ववादी साहित्याचा बिनीचा शिलेदार हरपला अशी भावना मराठी आणि इंग्रजी साहित्य वर्तुळात व्यक्त होत आहे.
किरण नगरकर हे आमचे जुने दोस्त. त्यांच्या कादंबरीने नवीन विचारांना सुरुवात केली. त्यांची नाटके रंगभूमीवर यावी अशी माझी इच्छा होती. मात्र सेन्सॉरशिपमुळे ते शक्य होत नव्हते. नगरकर त्यांच्या लेखनाने समाजातील प्रवृत्तीवर विचारपूर्वक काटेकोरपणे आघात करायचे. ‘ककोल्ड’ ही त्यांची अद्वितीय कादंबरी. त्या कादंबरीच्या मराठी आवृत्तीच्या निमित्ताने आमच्या भेटीगाठी वाढल्या. नगरकर यांना गांधी विचारांबद्दल कुतूहल होते. मी गांधी अभ्यासक असल्याने त्यांचे आणि माझे जमून गेले. अत्यंत नम्रतेने ते माझ्याशी वागत. – रामदास भटकळ, पॉप्युलर प्रकाशन




























































