
सामना ऑनलाईन । मुंबई
अंधेरी रेल्वे स्थानकात पूल कोसळल्याच्या दुर्घटनेनंतर भाजप खासदार किरीट सोमय्या अक्षरश: भिरभिरले. हा पूल रेल्वेचा असतानाही या दुर्घटनेबद्दल त्यांनी मुंबई महानगरपालिकेवर आरोप करायला सुरुवात केली आहे. पालिकेने या पुलाचे वेळीच ऑडिट केले नाही, असे सोमय्यांचे म्हणणे आहे. पण एल्फिन्स्टन दुर्घटनेनंतर पश्चिम रेल्वेच्या सर्व स्थानकांतील पुलांचे ऑडिट रेल्वेने केले होते आणि त्यात कोणत्याही पुलात दोष नसल्याचे नमूद होते याचा विसर सोमय्यांना पडला.
अंधेरीच्या घटनेबद्दल मीडियाशी बोलताना खासदार सोमय्या यांनी दोन रेल्वे स्थानकांदरम्यानचे पूल हे महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, महामार्ग प्राधिकरण, सिडको अशा स्थानिक प्रशासनांचे असतात, असे सांगितले. रेल्वे स्थानकात रेल्वेला गरजेचे जे पूल आहेत ते रेल्वे बांधते, असेही ते म्हणाले. त्यानंतर अंधेरीचा कोसळलेला गोखले पूल हा पादचारी पूल असल्याने तो पालिकेचा आहे असे सांगतानाच तो पूल रेल्वे ट्रकवर असल्याने रेल्वेच बांधू शकते, असेही विसंगत विधान त्यांनी केले.
अंधेरीचा पूल हा रेल्वेचा आहे आणि त्याची जबाबदारी ही रेल्वे प्रशासनाचीच असल्याचे महानगरपालिकेने स्पष्ट केल्याने सोमय्या हे तोंडघशी पडले आहेत. रेल्वेवरील पादचारी पुलांच्या देखभालीसाठी रेल्वेला पालिकेकडून पैसे मिळतात. असे असतानाही हा पूल कोसळला यात भाजप सरकारच्या अखत्यारीतील रेल्वे मंत्रालयाचा निष्काळजीपणाच कारणीभूत आहे हे उघड झाले आहे. त्यामुळेच आता दुर्घटनेला कोण जबाबदार आहे यावर चर्चा न करता सर्व लोकप्रतिनिधींनी एक व्हायला हवे, अशी भाषाही सोमय्या बोलू लागले आहेत.
मुंबईतील ४४५ पेक्षा पुलांचे सेफ्टी ऑडिट होणार
मुंबईतील ४४५ पेक्षा जास्त रोड ओव्हर आणि फूट ओव्हर ब्रिजचे सेफ्टी ऑडिट होणार आहे अशी माहिती रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी पत्रकार परिषदेत दिली. या सेफ्टी ऑडिटसाठी आयआयटीची मदत घेतली जाईल. पालिका आणि रेल्वे यांच्या साथीने हे ऑडिट केले जाईल. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी घटनास्थळी जाऊन रेल्वेच्या कामाची पाहणी केली. दरम्यान, या अपघाताची रेल्वे सुरक्षा आयुक्तांमार्फत चौकशी करून १५ दिवसांत अहवाल सादर केला जाईल असेही ते म्हणाले.




























































