टीम इंडियाला लाज वाटायला हवी, जय शहा, सूर्यावर कीर्ती आझाद भडकले; ‘83’ च्या वारशाचा विसर पडल्याची टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आयसीसी टी-20 वर्ल्डकप 2026 चा अंतिम सामना यजमान हिंदुस्थान आणि न्यूझीलंड संघात रविवारी रंगला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी मैदानात झालेल्या या लढतीत हिंदुस्थानने न्यूझीलंडचा धुव्वा उडवत तिसऱ्यांदा टी-20 वर्ल्डकप उंचावला. हिंदुस्थानच्या ऐतिहासिक विजयानंतर देशभरात जल्लोष करण्यात आला. या विजयानंतर काही खेळाडूंनी ट्रॉफीसह हनुमान मंदिराला भेट दिली. यावरून वादाला तोंड फुटले असून माजी क्रिकेटपटू आणि तृणमूल काँग्रेसचे खासदार कीर्ती आझाद यांनी कर्णधार सूर्यकुमार यादव आणि आयसीसीचे प्रमुख जय शहा यांच्यावर हल्ला चढवला.

कीर्ती आझाद यांनी हिंदुस्थानच्या विजयानंतर सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. टीम इंडियाला लाज वाटायला हवी. 1983 मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थानने वर्ल्डकप जिंकला होता. त्यावेळी हिंदुस्थानच्या संघात हिंदू, मुसलमान, शीख आणि ख्रिश्चन खेळाडूही होते. आम्ही वर्ल्डकप ट्रॉफी आपली धार्मिक जन्मभूमि आणि मातृभूमी हिंदुस्थानात आणली होती. आता हिंदुस्थानी संघाने ट्रॉफी मश्चिदमध्ये, चर्चमध्ये, गुरुद्वारामध्ये का नेली नाही? असा सवाल त्यांनी केला.

राष्ट्रीय संघ हा कोणत्याही धर्माचा विचार न करता सर्व हिंदुस्थानी नागरिकांचे प्रतिनिधित्व करतो, सूर्यकुमार यादव किंवा जय शहा यांच्या कुटुंबाचे नाही. सिराज कधी ही ट्रॉफी घेऊन मशिदीत गेला नाही किंवा संजू ही ट्रॉ़फी घेऊन चर्चमध्ये गेला नाही. ट्रॉफी जिंकून देण्यास संजूने महत्त्वाची भूमिका बजावली असून तो या स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूही ठरला. ही ट्रॉफी 140 कोटी हिंदुस्थानी नागरिकांची आहे. कुठल्याही एका धर्माच्या विजयाचा आनंद साजरा करण्याचे हे ठिकाण नाही, असेही त्यांनी सुनावले.

काँग्रेसचाही पाठींबा

काँग्रेसचे खासदार तारिक अन्वर यांनी आझाद यांच्या टीकेचे समर्थन केले आहे. त्यांनी आझाद यांच्या विधानाशी आपण पूर्ण सहमत असल्याचे म्हटले. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमधील ट्रॉफी विशिष्ट धार्मिक स्थळी नेणे ही हिंदुस्थानची परंपरा कधीच राहिलेली नाही. सार्वजनिक उत्सवांमध्ये धर्मनिरपेक्ष मूल्ये जपण्याचे महत्त्वही त्यांनी स्पष्ट केले.