।।प्रभु अजि गमला मनी तोषला।।गंधर्व युगाचा सन्मान!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आसावरी जोशी,[email protected]

येत्या १३ तारखेला अखिल भारतीय मराठी नाटय़संसमेलन होत आहे. खूप वर्षांनी संगीत रंगभूमीला मानाचे स्थान मिळाले आहे. यानिमित्त संमेलनाध्यक्ष कीर्ती शिलेदारांशी ऐसपैस गप्पा…

मराठी रंगभूमीचे भरजरी… समृद्ध… संपन्न… अभिजात वैभवाने संपन्न मानाचे पान… मराठी संगीत नाटक. संगीत नाटक हा नाटय़प्रकार संगीत आणि नाटय़ या कलाप्रकारांच्या संकरातून निर्माण झाला आहे असे म्हटले तरी संगीत नाटक हा मराठी रंगभूमीचा पाया आहे असेच म्हणावे लागेल.

संगीत शाकुंतल

१८८० साली बळवंत पांडुरंग किर्लोस्कर ऊर्फ अण्णासाहेब किर्लोस्करांनी मराठी रंगभूमीवर पहिले संगीत नाटक ‘संगीत शाकुंतल’ आणून संगीत नाटकांची वैभवशाली परंपरा सुरू केली. किर्लोस्कर नाटक मंडळींची नांदी हे त्यांचे वैशिष्टय़ होते. अण्णासाहेब किर्लोस्कर मराठीतील पहिले संगीत नाटककार, गायक नट आणि नाटय़शिक्षक होते. संगीत नाटकांची ही परंपरा पुढे अधिकाधिक संपन्न आणि समृद्ध होत गेली. गोविंद बल्लाळ देवल, कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे गंधर्वयुगाने संगीत रंगभूमीला सर्वोच्च स्थानावर नेऊन ठेवले. बालगंधर्वांनी त्यांच्या सर्वच संगीत नाटकांना स्वतःसारखेच नितांत देखणे आणि राजस केले. लोकमान्यांनी दिलेल्या पदवीचे नारायणरावांनी अगदी जीवापलीकडे सार्थक केले. बालगंधर्वांचे नाटक पाहणे म्हणजे एक समारंभच. विशेषतः महिलावर्गासाठी. बालगंधर्वांसारखी साडी, वेशभूषा, केशभूषा… एक नव्हे अनेक गोष्टींचे अनुकरण केले गेले.

एक विचार

संगीत नाटय़ हे केवळ एक करमणुकीचे नाटक कधीच नव्हते. तो एक विचार होता… आहे. पौराणिक, ऐतिहासिक प्रसंग त्यांना त्या काळाशी सुसंगत करून समाजमनातील वन्ही चेतवण्याचे काम संगीत नाटकांनी नेहमीच केले आहे. इंग्रजी राजवटीवर कोरडे ओढणारे ‘कीचकवध’ हे उदाहरण येथे पुरेसे होईल.

पुढे नाटकांच्या बदलत्या स्वरुपात, मराठी चित्रपटाच्या आगमनानंतर संगीत नाटके थोडी मागे पडू लागली. पण तरीही ही वैभवशाली परंपरा नेटाने जपण्याचे आणि राखण्याचे काम जयराम शिलेदार, जयमाला शिलेदार आणि त्यांच्या कन्या कीर्ती शिलेदार यांनी अक्षरशः वसा घेतल्यागत केले आणि करत आहेत.

यंदाच्या अखिल भारतीय मराठी नाटय़ संमेलनाच्या अध्यक्षपदी कीर्ती शिलेदारांची निवड करून जणू त्यांनी केलेल्या संगीत रंगभूमीच्या सेवेला रसिकांनी मानाचा मुजराच केला आहे.

अजूनही आवाजातील माधुर्य तसेच आहे. उच्चारांतील स्पष्टता रंगभूमीच्या संस्कारांचा वारसा सांगणारी… खूप आनंद वाटतोय… माझ्या आईने हे पद भूषवलंय. त्यामुळे त्याच खुर्चीवर बसताना विशेष आनंद होतोय. मुळात आमच्या संगीत रंगभूमीला बोलण्याची संधी फार कमी मिळते. पण मी मात्र या व्यासपीठावर आमच्या भावना मांडणार आहे. कीर्तीताई हळव्या होऊन सांगत होत्या.

महाराष्ट्राचं लेणं

संगीत नाटय़ परंपरा हे महाराष्ट्राचं लेणं आहे. समृद्ध, अभिजात गद्य आणि संगीताचा हा सुंदर मेळ आहे. या संगीत नाटय़ाने प्रेक्षकांची मनोभूमी रंगभूमीसाठी तयार केली. उत्तमोत्तम नाटककार, साहित्यिक, संगीतकारांना आपली कला या संगीत रंगभूमीमुळे रसिकांपुढे सादर करता आली.

पुढे कीर्तीताई म्हणाल्या की, संगीत नाटकांमुळे प्रेक्षकांचे व्यक्तिमत्त्व समृद्ध होते. पण काहीजणांच्या चुकीमुळे संगीत रंगभूमीवर अन्याय झालाय.

जसजसा काळ बदलला तसतसे कलाकारही एका वेळेस अनेक गोष्टी करू लागले. कालौघात गद्य रंगभूमीवरील अनेक चांगल्या गोष्टी समोर आल्या ज्या झटपट होणाऱया होत्या. त्यामुळे कलावंतांचा कल तिथे झुकला.

एनएसडीत सांगीतिक अभ्यासक्रम सक्तीचा

कीर्तीताई कळकळीने सांगत होत्या की, राष्ट्रीय नाटय़ प्रशिक्षण संस्थेत अर्थात एनएसडीमध्ये अजूनही सांगीतिक नाटक हा अभ्यासक्रम सक्तीचा आहे. दरवर्षी व्याख्याती म्हणून मला तेथे मानाचे बोलावणे असते. मग आपण ही आपल्याच मातीतून पुढे गेलेली परंपरा का नाही जपायची? आज राहणीमान बदललंय. करमणुकीच्या कल्पना बदलल्या आहेत. मग नवीन कलाकारांनी या नव्या कल्पनांसह संगीत रंगभूमीत भर घालायला हवी. गोव्यात अजूनही संगीत नाटक फार आत्मीयतेने सादर केले जाते.

शांत संगीत, शुद्ध मराठी भाषा संगीत रंगभूमीने जपली आहे. आजच्या ‘संगीत देवबाभळी’, ‘संगीत मत्स्यगंधा’ या संगीत नाटकांमुळे कीर्तीताईंच्या तरुणाईकडून अपेक्षा वाढल्या आहेत. प्रसाद कांबळी, संपदा जोगळेकर ही मंडळी खूप चांगलं काम करताहेत. अगदी राहुल देशपांडे, महेश काळे ही मुलंदेखील चांगलं काम करत आहेत असं आवर्जून कीर्तीताईंनी सांगितले. ‘कटय़ार काळजात घुसली’ चित्रपट रूपात आल्याने समाजाच्या प्रत्येक स्तरापर्यंत पोहोचले. अर्थात मुळात गाभा समृद्ध असल्यामुळेच हे शक्य झाले.

हे आमचे ध्येय

घरातील संगीत नाटय़ परंपरेविषयी बोलताना कीर्तीताई म्हणाल्या की संगीत नाटकांकडे आम्ही नेहमीच एक ध्येय म्हणून पाहिले आहे. आई, बाबा दोघेही गंधर्व नाटक मंडळीत होते. त्यांचे संस्कार आमच्यात पुरते भिनले आहेत. किर्लोस्करांची तिन्ही नाटकं करणारी आमची एकमेव संस्था आहे. उतरत्या काळात अनेक प्रलोभने आली. पण आम्ही आमच्या ध्येयापासून ढळलो नाही. आमच्या आईवडिलांनी दिलेल्या साध्या राहणीच्या संस्कारांवरच आम्ही चालत गेलो. पण संगीत नाटकांची ऐश मात्र पुरेपूर केली. त्यात मी अगदी तृप्त आहे, समाधानी आहे.

आज स्पर्धेचे युग आहे. अध्यक्षीय काळात नव्या प्रयोगांवर माझा भर असेल. शिबिरे घेऊ, नव्या कलाकारांना तयार करून घेऊ. एनएसडीची जागरुकता महाराष्ट्रात येण्याच्या दृष्टीने प्रयत्न करू. नवी पिढी उत्साही आहे. बुद्धिमान आहे. फक्त तिच्या ऊर्जेला योग्य दिशा मिळायला हवी. कीर्तीताई खूप उत्साहाने, तळमळीने सांगत होत्या.

आज अखिल भारतीय नाटय़ संमेलन खरोखरच वेगळ्या वाटेने निघाले आहे. तरुणाई आपल्या अभिजात परंपरेची जपणूक करताना दिसते आहे. ही परंपरा जपली जाऊन भरजरी संगीत रंगभूमीचे गंधर्वयुग पुन्हा अवतरावे हीच शुभेच्छा!!