
देशांतर्गत बाजारपेठेत शेतमाल सुरक्षित आणि जलद पोहचविण्यासाठी तीन आठवडय़ांपूर्वी सुरू झालेली पहिली किसान रेल्वे आता देवळाली ते मुजफ्फरपूर दरम्यान आठवडय़ातून दोनदा धावणार आहे. खासदार हेमंत गोडसे यांनी यासाठी पाठपुरावा केला होता. देवळाली येथून मंगळवारी आणि शुक्रवारी सायंकाळी 6 वाजता 17 बोगी असलेली ही रेल्वे शेतमालासह पुढे रवाना होणार आहे.
देशातील पहिल्या देवळाली ते दानापूर किसान रेल्वेचा शनिवारी, 7 ऑगस्ट रोजी शुभारंभ झाला. आतापर्यंत या रेल्वेच्या तीन फेऱया झाल्या असून, कमी दरात जलदगतीने एका राज्यातून दुसऱया राज्यात शेतमाल पोहचवणे शक्य झाले आहे. दुसऱया आठवडयापासून दर शुक्रवारी ही रेल्वे देवळाली ते मुजफ्फरपूर धावू लागली. शेतकऱयांचा त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. आठवडयातून दोनवेळा रेल्वे सुरू करावी, या मागणीची दखल घेत खासदार हेमंत गोडसे यांनी रेल्वेमंत्री पियूष गोयल आणि कृषीमंत्र्यांकडे पाठपुरावा केला. त्यांच्या मागणीनुसार रेल्वे आता 25 ऑगस्टपासून दर मंगळवारी आणि शुक्रवारी सायंकाळी 6 वाजता देवळाली स्थानकावरून सुटणार आहे. नाशिकरोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, ब्रहाणपूर, इटारसी, नरसिंगपूर, जबलपूर, सतना, माणिकपूर, प्रयागराज, बक्सर, दानापूर येथे थांबे असतील, त्यानंतर रेल्वे मुजफ्फरपूर गाठेल. मंगळवारी निघालेली रेल्वे गुरूवारी, तर शुक्रवारी निघालेली रेल्वे रविवारी मुजफ्फरपूरला पोहचेल. शेतमाल वाहतुकीसाठी शेतकरी, व्यापाऱयांनी जवळील स्थानकावरील मुख्य पार्सल पर्यवेक्षकांशी संपर्क साधण्याचे आवाहन भुसावळ मंडळाने केले आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱयांनाही फायदा व्हावा म्हणून कोल्हापूर-मनमाड लिंक विशेष किसान रेल्वे धावत आहे, ती देवळाली-मुजफ्फरपूर रेल्वेला मनमाड येथे जोडली जाते. सांगोला येथून मंगळवारी व शुक्रवारी सकाळी 8 वाजता निघणारी ही लिंक रेल्वे सायंकाळी साडेसहाला मनमाडला पोहोचणार आहे.
नाफेडच नोडल एजन्सी हवी
शेतमाल विक्रीचा फायदा जास्तीत जास्त शेतकऱयांना मिळावा, खरेदी – विक्री प्रक्रियेत पारदर्शकता यावी, यासाठी व्यापाऱयांच्या एजंटऐवजी नोडल एजन्सी म्हणून नाफेडची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणीदेखील खासदार गोडसे यांनी रेल्वे व कृषीमंत्र्यांकडे केली आहे.
322 टन शेतमाल रवाना
या रेल्वेच्या आतापर्यंत तीन फेऱया झाल्या आहेत. पहिल्या फेरीत 7 ऑगस्टला 73 टन, त्यानंतर 14 ऑगस्टला 98 आणि 21 ऑगस्ट रोजी 151 टन शेतमाल इतर राज्यांमध्ये पाठवण्यात आला आहे.

























































