स्वयंपाकघर – चमचमीत आणि सात्त्विक

9245

>> मीना आंबेरकर, [email protected]

प्रत्येक घराचा आत्मा घराच्या स्वयंपाकघरात असतो. आई–आजीच्या हातचे पारंपरिक पदार्थ नेहमीच चविष्ट आणि आरोग्यपूर्ण असतात. पाहूया स्वयंपाकघरातील मेजवानी.

स्वयंपाकघर ही घरातील पवित्र जागा. तेथे सतत अन्नपूर्णेचा वावर असणारी जागा. तेथे असते गृहिणीचे साम्राज्य.  पोटातून मनात जाण्याचा मार्ग येथूनच सुरू होतो. घरातील सर्वांच्या जिभेचे चोचले येथे पुरविले जातात. घरात येणारा अतिथी येथून तृप्त होऊन बाहेर पडतो. लहानांचे बालहट्ट येथेच पुरविले जातात. तसेच तरुणाईची चविष्ट, खमंग, चमचमीत खाण्याची आवड येथेच जोपासली जाते. तसेच ज्येष्ठांच्या प्रकृतीची, आरोग्याची जपणूक करीत त्यांना तृप्तीचा ढेकर देण्याची सोय येथेच होते.आज पूर्वीचे स्वयंपाकघर हे आधुनिक ‘किचन’ बनले आहे. आज तेथे वावरताना गृहिणींचे श्रम कसे वाचवावेत याची काळजी घेतली जाते. तिच्या कामाचा भार हलका कसा होईल याचा विचार केला जातो. अन्न शिजवण्यासाठी सोयीस्कर अशी साधने, उपकरणे यांची रेलचेल असते. स्वयंपाक करताना, अन्न शिजवताना गृहिणीला आनंद कसा वाटेल याचा विचार केलेला असतो. गृहिणीला जास्त ऊठबस करावी लागू नये याची काळजी घेतली जाते.

ही सर्व साधनसामग्री वापरून स्वयंपाक करताना, अन्न शिजवताना गृहिणीला आनंदच वाटत असणार. असे हे आजचे ‘किचन’ घराची शोभा वाढवण्याचे काम व्यवस्थितपणे करीत आहे, तर अशा या स्वयंपाकघरात आपण दर शनिवारी वावरणार आहोत. असे हे सुसज्ज किचन नवनवीन, वेगवेगळय़ा खाद्यपदार्थांचे उगमस्थान बनणार असले तरी या नाविन्याच्या जोडीला आपण आपल्या पारंपरिक खाद्यकृती, पारंपरिक पदार्थांनाही वाव देणार आहोत. किंबहुना काही विस्मृतीत गेलेले पारंपरिक पदार्थ आपण नवीन दृष्टिकोनातून करण्याचा प्रयत्न करणार आहोत, करताना ते अधिक सुटसुटीत, अधिक रुचीपूर्ण, स्वादीष्ट कसे बनतील याचाही विचार करणार आहोत. येथे आपण आहारशास्त्राचाही विचार करणार आहोत. त्यांच्या सेवनाने आपले आरोग्य अबाधित कसे राहील हेही आपण पाहणार आहोत.

आपण ज्या खाद्यकृती बनविणार आहोत त्या जरी पारंपरिक असल्या तरी साध्या, सोप्या असणार आहेत. आपल्या स्वयंपाकघरात ज्या गोष्टी सहज उपलब्ध असतील त्यांचाच वापर करून या खाद्यकृती बनणार आहेत. तर मग तुम्ही तयार आहात ना मला मदत करायला? मग लागू तयारीला.

ताकातली मेथीची पळीवाढी भाजी

साहित्य – मेथी 2 लहान जुडय़ा, 4 चमचे बेसन, चवीनुसार तिखट व मीठ, एक वाटी साधारण आंबट ताक आवडत असल्यास 2 चमचे चणाडाळ व शेंगदाणे भिजवलेले, दहा बारा लसूण पाकळय़ा बारीक चिरून, 2 सुक्या मिरच्या तुकडे करून, पाव चमचा हळद, फोडणीसाठी 4 चमचे तेल.

कृती – मेथी स्वच्छ धुऊन बारीक चिरून घ्यावी व किंचित तेलावर परतून थोडे पाणी घालून शिजवून घ्यावी. डाळ व शेंगदाणे घालणार असल्यास ते मऊ शिजवून घ्यावेत. ताकात बेसन एकजीव करून घ्यावे त्यातच तिखटमीठ घालून घ्यावे. मेथी शिजल्यानंतर ती हलकीशी घोटून घ्यावी. त्यात तयार केलेले ताक, आवडत असल्यास थोडा गूळ घालावा म्हणजे मेथीचा कडवटपणा जाणवत नाही. हे मिश्रण चांगले उकळावे. तेलात लसूण व सुक्या मिरच्या घालून जीवंत फोडणी करावी व गार झालेल्या भाजीवर ओतावी. गरम पोळी/ भातावर घ्यावी.

गाजराचा हलवा

साहित्य – पाच वाटय़ा गाजराचा कीस, 1 वाटी खवा किंवा अर्धा लिटर दूध, दोन वाटय़ा साखर, 1 टीस्पून आल्याचा रस, सुका मेवा आवडीप्रमाणे, वेलची, जायफळ पावडर, तूप.

कृती – डावभर साजूक तुपात गाजराचा कीस हलकेच परतून मंद विस्तवावर वाफवून घ्यावा. दूध घालणार असल्यास कीस शिजतानाच घालावे. दूध आटेपर्यंत मिश्रण चुलीवर ठेवावे. त्यात आल्याचा रस व साखर घालावी. साखर विरघळेपर्यंत ते ढवळत रहावे. खवा घालणार असल्यास गाजराचा कीस शिजल्यावर खवा व साखर घालावी. सतत ढवळत राहावे. वेलची, जायफळ पूड घालावी. आवडीप्रमाणे बदाम-पिस्त्याचे काप घालावेत व थलथलीत घट्टसर हलवा पसरट भांडय़ात ओतावा.

 तिखट मिठाच्या पुऱ्या

साहित्य – 4 वाटय़ा कणीक, 1 वाटी बारीक रवा, अर्धी वाटी डाळीचे पीठ, 3 टेबलस्पून कडकडीत तेलाचे मोहन, 2 टीस्पून लाल तिखट (आवडत असल्यास हिरवी मिरची, कोथिंबीर व लसूण यांची पेस्ट), 2 टीस्पून मीठ, 1 टेस्पून पांढरे कच्चे तीळ, 1 टीस्पून ओवा, 1 टीस्पून जिरे, अर्धा टीस्पून हळद, 2 वाटय़ा तेल तळणीकरिता.

कृती – वरील सर्व साहित्य एकत्र करून घट्ट कणिक भिजवावी व अर्ध्या तासानंतर पुऱ्या करायला घ्याव्यात. पुऱ्या तेलात टाकल्यानंतर एकसारख्या उलटू नयेत. खालची बाजू खरपूस तळल्यानंतर एकदाच पुरी उलटावी. नाहीतर पुऱ्या तेलकट होतील. पुऱ्या तळून कागदावर पसरून ठेवाव्यात.

सोप्या टीप्स

  • डाळीचे पीठ पालेभाजीला लावतात. ते अगोदर गार पाण्यात कालवून लावावे. गुठळय़ा होत नाहीत.
  • पोळीची कणीक मळताना लहान बटाटा उकडून घालावा. पोळय़ा मऊ होतात.
आपली प्रतिक्रिया द्या