गोव्यात 17 आणि 18 जानेवारीला रंगणार आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । पणजी

बेळगाव येथील परिवर्तन परिवारातर्फे आयोजित यंदाचा पतंग महोत्सव 17 व 18 जानेवारी रोजी मांद्रे समुद्र किनाऱ्यावर होणार आहे. त्यात देशविदेशातील अनेकजण सहभागी होणार आहेत. बेळगावच्या परिवर्तन परिवाराकडून आमदार अभय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी गोवा पर्यटन महामंडळाच्या सहकार्याने अयोजित करण्यात येणारा हा अंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव मिरामार समुद्र किनाऱ्यावर होत होता. परंतु यंदा तो मांद्रे समुद्र किनाऱ्यावर होणार आहे. पतंग महोत्सव राज्यात सर्वत्र करण्यात यावा अशी सूचना राज्य सरकारची होती. त्यामुळे प्रत्येक वर्षी विविध ठिकाणी हा महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे अशी माहिती आयोजकांतर्फे अशोक नाईक यांनी दिली.

पतंग महोत्सव 17जानेवारीला सकाळी 10.30 वाजता सुरू होईल तर 18 जानेवारीला दुपारी 2 वाजता त्याचा समारोप होणार आहे. गोव्यात होणाऱ्या या महोत्सवात बेल्जियम, कॅनडा, इस्टोनिया, टर्की, मलेशिया, जर्मनी, ब्रिटन, रशिया आणि इटालीहून प्रत्येकी दोनजण सहभागी होणार आहेत. तसेच अस्ट्रेलिया व सिंगापूरमधून एक एक जण सहभागी होणार आहे. विदेशातून येणारे कलाकार पतंग उडविण्याच्या त्यांच्या छंदासाठी येतात. त्यांना मानधन दिले जाते. शिवाय या महोत्सवासाठी त्यांच्या राहण्याचा आणि इतर खर्च सुमारे 32 लाख रुपयांपर्यंत होतो. पर्यटन महामंडळाकडूनही या कार्यक्रमासाठी सहकार्य दिले जात असल्याचे सतीश कुलकर्णी यांनी सांगितले.