पतंगाचा मांजा ठरतोय जीवघेणा, बाईकवरील तरुण थोडक्यात बचावला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संक्रांत जवळ आल्याने सध्या पतंग उडवण्याचा मोसम आहे. पण महामार्गांलगत पतंग उडवण्याची ही हौस बाईकस्वारांच्या जीवावर बेततेय. विलेपार्ले येथील सहार जंक्शन येथील महामार्गावर याच पतंगाच्या मांजाने गळा चिरता चिरता राहिला. गळय़ावर आले ते बोटांवर दुखापत होण्यात निभावले. दैव बलवत्तर म्हणूनच स्वप्नील गायकर हा 29 वर्षांचा तरुण बचावला.

चुनाभट्टी येथे राहणारा स्वप्नील गायकर हा कांदिवली येथील महिंद्रा अॅण्ड महिंद्रा कंपनीत कामाला आहे. कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी स्वप्नीलकडून बाईकचा वापर केला जातो. हा तरुण बाइकवरून घरी परतत असताना सहार जंक्शनजवळ त्याच्या गळ्यात मांजा अडकल्याने तो खेचला गेला. सावधगिरीने बाईक थांबवत व मांजा हाताने दूर करण्याचा प्रयत्न करीत स्वप्नीलने स्वतःचा बचाव केला. गळय़ावर मांजाने कापले होते आणि दोन्ही हातांच्या बोटांनाही कापले गेले. त्याचवेळी मागून बाईकवरून येत असलेला स्वप्नीलचा मित्र प्रकाश पवार याच्या ही बाब लक्षात आली. मांजाने कापल्याने रक्तबंबाळ झालेल्या स्वप्नीलला एस. एल. रहेजा रुग्णालयात नेण्यात आले. तिथे त्याच्यावर उपचार झाल्याने तो बचावला.

यासंदर्भात रहेजा येथील पोलिसांनी स्वप्नीलचा जबाब नोंदवला. मात्र ही बाब भयानक असून महामार्गांजवळ उडवल्या जाणाऱ्या पतंगीचा खेळ माझ्याप्रमाणे कोणाच्याची जीवावर बेतू शकतो अशी प्रतिक्रिया स्वप्नीलने व्यक्त केली आहे. शिवसेनेचे सोशल मीडिया समन्वयक स्वप्नील म्हात्रे यांच्याकडूनही जखमी स्वप्नीलची विचारपूस करण्यात आली.