वाढत्या वजनावर नियंत्रण ठेवा, गुडघेदुखीवर मात करा! डॉक्टरांचा आरोग्यमंत्र

2486

बदलती जीवनशैली, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे वजन वाढते. या वाढत्या वजनाचा गुडघ्यांवर येणाऱया भारामुळे मोठय़ा प्रमाणात गुडघेदुखीचा त्रास सतावत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे गुडघे प्रत्यारोपणासारख्या शस्त्रक्रियांचा आधार घेतला जातो. मात्र गुडघेदुखीच्या त्रासापासून दूर राहायचे असल्यास वजन आटोक्यात ठेवले तर शस्त्रक्रिया करणे टाळता येऊ शकते असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. तज्ञ डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या दोन वर्षांत सुमारे 250 रुग्णांनी गुडघेदुखी टाळण्यासाठी वेट लॉस तसेच बॅरीएट्रिक सर्जरीचा मार्ग अवलंबिला आहे. वजन नियंत्रणात असले तर नक्कीच गुडघेदुखीसारख्या आजारापासून दूर राहता येते.

वाढते वजन हे अनेक आजारांना आमंत्रण देणारे असते. 54 वर्षांच्या मुंबईतील रहिवासी सुश्री कस्तुरबा गाला यांनाही वाढत्या वजनाची समस्या भेडसावू लागली. वाढत्या वजनामुळे त्यांना चालता येत नव्हते. तिला ऑस्टियोआर्थरायटिसचे निदान झाले ज्यामुळे तिच्या उजव्या पायावर कृत्रिम गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाली. चार वर्षांनंतर तिला पुन्हा गुडघेदुखीच्या वेदना सतावू लागल्या. लठ्ठपणामुळे तिला मधुमेह, हृदयरोग आणि इतर आरोग्याच्या समस्यांचा धोका वाढू लागला आणि तिच्या दैनंदिन कामामध्ये अडचणी येऊ लागल्या.

याबाबत मुलुंडच्या आस्था हेल्थकेअरचे ओबेसिटी सर्जन डॉ. मनीष मोटवानी म्हणाले, कस्तुरबा यांचे वजन 143 किलो होते आणि तरीही तिच्यावर गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली. शरीरातील अतिरिक्त चरबीमुळे गुडघ्यांच्या स्नयूंवर ताण येत होता. त्यांच्या आरोग्याच्या सर्व प्रश्नांचे मूळ कारण लठ्ठपणा होते. निरोगी गुडघ्यांची गुरुकिल्ली म्हणजे शरीराचे वजन नियंत्रित ठेवणे. यामुळे शरीराचा अतिरिक्त भार गुडघ्यांवर येणार नाही आणि गुडघेदुखीसारखी समस्या उद्भवणार नाही.

आपली प्रतिक्रिया द्या