वर्ल्ड कपमध्ये प्ले ऑफ असायला हवे, विराट कोहलीचे मत

सामना प्रतिनिधी । मँचेस्टर

हिंदुस्थानचा क्रिकेट संघ साखळी फेरीअखेर गुणतालिकेत 15 गुणांसह अव्वल स्थानावर होता. पण न्यूझीलंडविरुद्धच्या सेमी फायनलच्या लढतीत 45 मिनिटांच्या खराब खेळामुळे टीम इंडियाचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. आयपीएलमध्ये गुणतालिकेत अव्वल दोन स्थानांवर असलेल्या संघांना अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी दोन संधी उपलब्ध असतात. आयपीएमधील प्ले ऑफप्रमाणे वर्ल्ड कपमध्येही या नियमाचा अवलंब झाल्यास गुणतालिकेत पहिल्या स्थानावरील संघाला एका पराभवानंतरही अंतिम फेरीत पोहोचण्याची आशा बाळगता येईल, असे विराट कोहलीला वाटते.

धोनीची पाठराखण

विश्वचषक उपांत्य लढतीत हिंदुस्थानने बुधवारी न्यूझीलंडकडून 18 धावांनी पराभव पत्करला. टीम इंडियाच्या धावसंख्येत धोनीने 72 चेंडूंत साकारलेल्या 50 धावांचे महत्त्वाचे योगदान होते, परंतु मधल्या षटकांमधील धोनीच्या संथ फलंदाजीची कोहलीने पुन्हा पाठराखण केली. वेस्ट इंडीज दौर्‍यासाठी हिंदुस्थानी संघाची घोषणा लवकरच होणार आहे. धोनीने आपल्या भविष्यातील योजनांबाबत काही सांगितले आहे का, या प्रश्नाला उत्तर देताना कोहली म्हणाला, ‘आतापर्यंत तरीत्याने आम्हाला काहीही सांगिलेले नाही.’

यशाची हुलकावणी

आमच्याकडे जे होते ते सारे आम्ही संघाच्या विजयासाठी दिले, पण दुर्दैवाने यशाने आम्हाला हुलकावणी दिली याचेच दुःख आहे. हिंदुस्थानी चाहते मोठय़ा संख्येने आपल्या संघाला पाठिंबा देण्यासाठी इंग्लंडमध्ये आले. त्यांच्या शुभेच्छांच्या बळावरच आम्ही यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत साखळी लढतींत चमकदार कामगिरी नोंदवू शकलो. तुमच्या बहुमूल्य प्रेमाचे मोल करता येणार नाही. टीम इंडियाच्या निसटत्या पराभवाने आपणा सर्वांचेच हृदय जखमी झालेय. तुमच्या भावना मी समजू शकतो. जय हिंद, अशी भावनिक प्रतिक्रिया टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याने हिंदुस्थानी क्रिकेटशौकिनांचे सांत्वन करताना व्यक्त केली.