नैसर्गिक संकटाने कोकण झाले भकास; अतिवृष्टी, महापूराने प्रचंड नुकसान

चार दिवसापासून कोकणात धुमाकूळ घालणाऱ्या पावसाचा जोर आता ओसरला असला तरी या चार दिवसात झालेल्या अतिवृष्टीने कोकणाला मोठा फटका बसला आहे. महापूरात अनेकांचे संसार वाहून गेले आहेत. तर या नेसर्गिक आपत्तीने मोठ्या प्रमाणात जीवीतहानी झाली आहे. रायगड जिल्ह्यातील महाड, रत्नागिरी जिल्ह्यातील खेड, चिपळुण या तालुक्यांमध्ये पावसामुळे प्रचंड नुकसान झाले आहे.

कोकणात पुराच्या पाण्यात अनेकांचे संसार वाहून गेले आहेत. काही कुटुंबे दरडीखाली गाडली गेली आहेत. दोन गावांना जोडणारे साकव, पूल वाहून गेले आहेत, रस्ते खचले आहेत. त्यामुळे या नैसर्गिक संकटामुळे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. बुधवारी दुपारपासून कोकणात जोरदार पावसाला सुरवात झाली. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजाप्रमाणे पाऊस कोसळू लागला. मात्र, पाऊस कोकणासाठी नवीन नसल्याने सुरवातीला पावसाकडे गांभिर्याने लक्ष देण्यात आले नाही. मध्यरात्रीपासून पावसाचा जोर वाढला आणि कोकणातील मुख्य नद्या धोक्याची पातळी ओलांडून वाहू लागल्या. काही वेळातच या नद्यांनी महाड, खेड, चिपळूण ही शहरे व लगतची गावे कवेत घेतली आणि एकच हाहाकार उडाला.

पावसाचा जोर इतका होता की, त्यामुळे काही ठिकाणी दरडी कोसळल्या. खेड तालुक्यातील बिरमणी मोरेवाडी येथे गुरुवारी रात्री 12.30 वाजण्याच्या सुमारास जयवंत मोरे यांच्या घरावर डोंगराचा एक भाग कोसळला आणि यामध्ये घरात झोपलेले जयवंत व त्यांची पत्नी ललीता या दोघांचाही मृत्यू झाला. त्याच रात्री पोसरे बौद्धवाडी येथे दरड कोसळल्याने सात कुटुंबातील 19 जण आणि दोन गोठ्यातील 24 जनावरे दरडीखाली गाडली गेली. चिपळूण येथेही अशीच हृदयद्रावक घटना घडली. पुराच्या
पाण्यातून जीव वाचविण्यासाठी शहर व परिसरातील जनता निकराचा प्रयत्न करत असतानाच अपरांत रुग्णालयाच्या कोविड केअर सेंटरमध्ये पुराचे पाणी शिरले आणि ऑक्सिजनवर असलेल्या 10 रुग्णांचा मृत्यू झाला. या कोवीड केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या इतर रुग्णांचेही खूप हाल झाले.

शुक्रवार दुपारपासून पावसाचा जोर कमी झाला आणि हळुहळु पुरपरिस्थिती निवळू लागली. या काळात मदतकार्य करणारी पथकेही नुकसान झालेल्या क्षेत्रात दाखल झाली आणि अनेक तास घरांच्या छपरावर किंवा इमारतीच्या टेरेसवर जीव मुठीत धरुन बसलेल्या नागरिकांची सुटका करायला सुरवात झाली. आता पाऊस थांबल्याने मदत कार्याला वेग आला आहे. पुरग्रस्तांना मदतही करण्यात येत आहे. या नैसर्गिक संकटावर मात करत त्यातून बाहेर पडण्याचे आव्हान आता कोकणासमोर आहे.

आपली प्रतिक्रिया द्या