
लॉकडाऊनच्या कालावधीत काहीतरी वेगळे करावे या इराद्याने मी दररोज एक जलरंग कलाकृती साकारायचे ठरवले. हा नियम मोडून दिवसभर जलरंग आणि निसर्ग यांच्यासोबत राहून गेल्या 25 दिवसांत जवळपास शंभर कलाकृती साकारल्या आहेत. कोकणचा निसर्ग रसिकांनी कलाकाराच्या नजरेतून पहावा आणि निसर्गातील अद्भुत दृश्ये पहायला मिळावीत हा यामागील उद्देश आहे. या सर्व कलाकृतींचे लवकरच प्रदर्शन भरविण्याचा माझा मानस आहे. – प्रणय फराटे
संकटकाळात काळजी घेणे आवश्यक आहेच. मात्र अशा कालावधीत योग्य प्रकारे स्वत:ची काळजी घेत निसर्गाच्या सान्निध्यात स्वतŠला झोकून दिले तर निसर्ग आपल्याबरोबर बोलू लागतो . लॉकडाऊनच्या या कठीण प्रसंगात आपल्या कुंचल्याच्या सहाय्याने निसर्गालाही बोलतं करण्याची किमया साध्य केली आहे ती रत्नागिरी जिह्याच्या मंडणगड तालुक्यातील वलवते गावातील युवा चित्रकार प्रणय प्रकाश फराटे याने. कोरोनामुळे सर्वत्र बंद असताना कुंचल्याने जलरंगाचे अप्रतिम फटकारे मारत प्रणयने तब्बल शंभर जलरंगांतील कलाकृती साकार केल्या आहेत.
घरची परिस्थिती हलाखीची असतानाही त्यावर जिद्दीने मात करत प्रणय सध्या सह्याद्री कला महाविद्यालयात कला शिक्षण घेत आहे. मंडणगड तालुक्यातील वलवते गावातून पायी जात त्याने प्राथमिक माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. बालपणीच मातृछत्र हरपल्याने घरात आजी-आजोबांना कामात मदत करून त्याला शाळेत जावे लागे. प्रणयचे वडील प्रकाश फराटे हे कामानिमित्त मुंबईला असतात. परिणामी आजी-आजोबांच्या देखभालीची जबाबदारी प्रणयवर येऊन पडली. मात्र हे सारे आनंदाने करत त्याने बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. बालपणापासून चित्रकलेची असणारी आवड अखेरीस त्याला सह्याद्री कला महाविद्यालयापर्यंत घेऊन आली. कलाशिक्षण घेणे हे मोठे खर्चिक काम असल्याने प्रणयला हा खर्च करणे खूपच कठीण. मात्र जलरंग माध्यमाच्या विविध स्पर्धांमधून भाग घेत प्रणयने बक्षिसे मिळवत स्वतŠच आपल्या शिक्षणाला हातभार लावला आहे. सह्याद्री कला महाविद्यालयात दोन वर्षांचा कलाशिक्षक पदविका कोर्स पूर्ण केल्यानंतर प्रणयने रंग आणि रेखाकला शिक्षण घ्यायचे ठरवले.
आयुष्यात काहीतरी वेगळे करायचे असेल तर, जलरंगावर प्रभुत्व मिळवायला हवे असा निश्चय करून प्रणय जलरंगात दररोज एक याप्रमाणे आजवर चित्र रेखाटत आला आहे. निसर्गाच्या सान्निध्यात रमण्याची आवड असल्याने त्याच्या नजरेला निसर्गातील प्रत्येक घटक रेखाटनासाठी खुणावत असतो. प्रणयची जलरंगातील चित्रे पाहिली की, त्याच्याजवळ जणू निसर्ग संवाद साधत असल्याचा भास होतो. चित्रात जिवंतपणा कसा आणि किती असावा, हे प्रणयची चित्रे पाहिल्यानंतर खऱया अर्थाने लक्षात येते, असे मत सह्याद्री कला महाविद्यालयाचे प्राचार्य माणिक यादव आणि प्रणयला शिकवणारे प्राध्यापक अवधूत खातू यांनी व्यक्त केले. कोकणचा हा हीरा भविष्यात आपल्या कलेच्या माध्यमातून कोकणचे नाव सातासमुद्रापार पोहोचवेल असा विश्वास सह्याद्री कला महाविद्यालयाचे चेअरमन ज्येष्ठ शिल्पकार आणि चित्रकार प्रकाश राजेशिर्पे यांनी व्यक्त केला आहे. स्वच्छ प्रवाही रंगलेपन पद्धती, निसर्गाचे हुबेहूब रेखाटन, छाया प्रकाशाचे अचूक दर्शन, रेखाटनातील बारकावे आणि सर्वाधिक महत्त्वाचे म्हणजे काम करण्याची कमालीची तळमळ ही प्रणयच्या जलरंग शैलीची खरी वैशिष्टय़े आहेत.






























































