कोळथरेत कोकण महोत्सवाचे आयोजन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोकोम इव्हेंट आणि जेसीआय, दापोली यांच्या संयुक्त विद्यमाने कोळथरे कोकण महोत्सव अर्थात कोकोम महोत्सवाचे आयोजन 29 एप्रिल ते 1 मे 2022 या दरम्यान दापोली तालुक्यातील पंचनदी येथील व्हॅली विंड्स रिसॉर्टच्या आवारात कोकण महोत्सवाचे आयोजन करण्यात आले.

या महोत्सवाची सुरुवात 29, एप्रिल रोजी ग्रंथदिंडी आणि ज्ञानेश्वरांच्या पालखीचे पूजन करून करण्यात येणार आहे. दापोली शहरातील ए. जी. हायस्कूल येथून या ग्रंथदिंडीला सुरुवात होईल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चैक, एस. टी. बसस्थानक चैक, मच्छी मार्केट मार्गे बाजार पेठ लाला परब नाका, पोस्ट गल्ली मार्गे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ या ग्रंथदिंडीचा समारोप होईल. त्याच दिवशी सायंकाळी 6.30 वाजता व्हॅली विंड्स रिसॉर्टच्या सभामंडपामध्ये महोत्सवाचा उद्घाटन समारंभ मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात सुप्रसिद्ध ओडिसी नृत्यांगना रसिका गुमास्ते या विशेष सादरीकरण करणार आहेत. सायंकाळी 7.30वाजता ‘येवा कोकण आपलाच असा’ हा कार्यक्रम होईल.

30 एप्रिल रोजी सकाळी 9 ते 1 वाजेपर्यंत प्रसिद्ध पक्षीतज्ञ व निसर्ग मित्र किरण पुरंदरे यांचा ‘चिऊ काऊच्या गोष्टी’ हा विशेष कार्यक्रम होईल, सायंकाळी 5 ते 7 या वेळेमध्ये व्यावसायिक परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात कोकणातील अनुभवी, मान्यवर विविध विषयांवर संवाद साधणार आहेत. यामध्ये अरविंद अमृते (कोकणातील उद्योजकता), डॉ. प्रमोद सावंत (कोकणातील पर्यटन व्यवसायाच्या संधी), डॉ. केतकी बर्वे (फूड प्रोसेसिंग परदेशातील संधी). सायंकाळी 7.30 ते 8.30 वाजता ज्येष्ठ मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांची मुलाखत आणि फिरक्या घेणार आहेत प्रसिद्ध ग्रंथ प्रकाशक राजीव बर्वे.

हे सर्व कार्यक्रम व्हॅली विंड्स रिसॉर्टच्या सभामंडपामध्ये होणार आहेत. सुप्रसिद्ध संगीत आयोजक अमर ओक, बासरी वादक श्रुती भावे, सारेगमपच्या लिटिल चॅम्प अंतिम फेरीतील स्पर्धक शमिका भिडे यांचा फर्माइश स्वरोत्सव कार्यक्रम रात्री 9.30 वाजता सुरू होईल. 1 मे रोजी महाराष्ट्र दिन सोहळा आणि महोत्सवाचा समारोप सोहळा सकाळी 10 वाजता सुरू होईल. त्यात विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींना कोकण सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. या महोत्सवामध्ये कोकणातील स्थानिक व्यावसायिकांचे स्टॉल्स, कोकणी पदार्थांचे स्टॉल्स, आंब्याचे स्टॉल्सदेखील असतील. त्यामुळे दापोलीकरानी या कोकण महोत्सवाला आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.