
परतीच्या वादळी पावसाने आंब्यांची फुटलेली पालवी नष्ट केली आहे.आताच आंब्यावर तुडतुडा पडला आहे. यंदाही आंबा नुकसानीच्या संकटात अडकला असल्याचे सांगत आंब्याच्या डहाळी घेऊन बागायतदारांनी पत्रकार परिषदेत आक्रोश केला. आंबा बागायतदारांना सहानुभूतीपर तात्काळ नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी आंबा बागायतदारांनी आज पत्रकार परिषदेत केली.
आंबा बागायतदार प्रकाश साळवी यांनी आज दि.11नोव्हेंबर 2025 रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत आंबा बागायतदारांची व्यथा मांडली. यंदा ५ मे पासून पाऊस सुरू झाला. अनेक बागायतदारांनी झाडावरून आंबे उतरवले नव्हते. पावसामुळे बागायतदारांचे प्रचंड नुकसान झाले. या नुकसानग्रस्त बागायतदारांना २५ टक्के नुकसानभरपाई सरकारने द्यावी अशी मागणी त्यांनी केली. त्याचबरोबर परतीच्या पावसामुळे आंब्याचे नुकसान झाले आहे त्याचा पंचनामा न करता आंबा बागायतदारांना सहानूभूती अनुदान द्यावे. सर्व शेतकरी आणि मच्छिमारांची २०१५पासूनची कर्ज माफ करावी. पुनर्गठन कर्जावरील व्याजाच्या रक्कमा विनाअट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा कराव्यात. पीक विम्याचा फायदा कोकणातील शेतकऱ्यांना मिळत नाही त्यामुळे विम्याचे निकष बदलावेत. निकष ठरवताना शेतकऱ्यांच्या संस्थेच्या प्रतिनिधीला सहभागी करावे. विम्याची रक्कम खासगी कंपन्या मार्फत न देता ती शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा करावी. कोकणातील फळझाडे कायम स्वरूपाची असतात त्यामुळे फळबागांना ई-पीक पहाणी रद्द करावी. सर्व प्रकारच्या शेती व मत्स्य उत्पादनाला हमी भाव मिळावा. शेतकऱ्यांकडून सक्तीची कर्ज वसुली थांबवावी व अन्य काही मागण्या बागायतदारांनी मांडल्या.
बॅंकांनी शेतकऱ्यांचा सिबील पाहू नये.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की,बॅंकांना कर्ज देताना शेतकऱ्यांना कर्ज देताना सीबील पाहू नये. पण आजही बॅंका कर्ज मागायला गेलेल्या शेतकऱ्यांचा सीबील पहातात. आम्ही बॅंकेला विचारणा केली तर आम्हाला सिबील न पहाण्याचा सरकारकडून लेखी आदेश नाही असं सांगतात. आमची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी आहे की त्यांनी बॅंकांनी शेतकऱ्यांचा सीबील पाहू नये अशा आदेशाचे परिपत्रक काढावे असे आंबा बागायतदार राजेंद्र कदम यांनी सांगितले.
पालकमंत्र्यांनी कधीही चर्चेला बोलावले नाही.
आंबा बागायतदारांच्या मागण्यांचे निवेदन आम्ही अनेक वेळा मुख्यमंत्री,अर्थमंत्री आणि रत्नागिरीच्या पालकमंत्र्यांना दिले होते. पण पालकमंत्री उदय सामंत यांनी एकदाही आम्हाला चर्चेसाठी बोलावले नाही हि आमची खंत असल्याचे प्रकाश साळवी यांनी सांगितले.
हंगाम लांबणार
ऑक्टोबर महिन्यात आंब्याच्या झाडांना पालवी फुटली होती. वादळी पावसाने ती पालवी नष्ट केली आहे. आता नोव्हेंबर किंवा डिसेंबरपर्यंत नव्याने पालवी फुटली तरी आंबा उत्पादन लांबणीवर जाईल अशी भीती राजेंद्र कदम यांनी व्यक्त केली.
































































