कोकण मार्गावरील उन्हाळी सुट्ट्यांच्या 11 मेपर्यंतच्या सर्व गाडय़ा फुल्ल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोकणात उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये गावी जाणाऱया सर्व नियमित मेल एक्स्प्रेस आतापासूनच फुल्ल झाल्या असून चाकरमान्यांच्या हाती 300 पर्यंतची प्रतीक्षा यादी पडली आहे. त्यामुळे उन्हाळी हंगामासाठी जादा गाडय़ा सोडण्याची मागणी होत आहे. दुसरीकडे कोकणातील आंगणेवाडीची यात्रा 17 फेब्रुवारीला असून त्या गाडय़ांचीदेखील तिकिटे हातोहात संपली असल्याने चाकरमान्यांचे लक्ष आता रेल्वे प्रशासनाकडून सोडल्या जाणाऱया जादा गाडय़ांकडे लागले आहे.

मध्य आणि कोकण रेल्वेच्या वतीने कोकणातील आंगणेवाडीच्या जत्रेसाठी जादा गाडय़ा सोडण्यात येत असतात. रविवारची स्थिती पाहता कोकणात जाणाऱया 11 मेपर्यंतच्या सर्व गाडय़ांची तिकिटे आरक्षित झाली आहेत. त्यामुळे उन्हाळी हंगामात होणाऱया गर्दीसाठी रेल्वे प्रशासनाने जादा गाडय़ा सोडण्याची मागणी होत आहे. रेल्वे हंगामात विशेष गाडय़ा सोडते, परंतु त्यांना ‘स्पेशल फेअर’ आकारते त्यामुळे आधीच लांबच्या प्रवासाचे तिकीट 1 जानेवारीपासून किमान 25 रुपयांपर्यंत महागले आहे. त्यातच स्पेशल गाडय़ांना ‘स्पेशल फेअर’ आकारल्यास या महागडय़ा गाडय़ा सर्वसामान्यांच्या आवाक्यापलीकडच्या असल्याने त्यांना स्पेशल फेअर आकारण्यात येऊ नये अशी प्रवासी बळीराम राणे यांनी केली आहे.

मामाच्या गावाला जाण्यासाठी जादा गाडय़ा सोडा
उन्हाळ्याच्या सुट्टीत मामाच्या गावाला जाण्याची तयारी बच्चे कंपनीसाठी पर्वणी असते. गणपती सणानंतर होळी आणि मे महिन्याच्या सुट्टीत मुलांना शाळांच्या सुट्टय़ा लागल्या की, चाकरमानी गावी जाण्यासाठी आतापासून नव्या नियमांप्रमाणे 120 दिवस आधी गाडय़ांची तिकिटे आरक्षित करण्यासाठी फिल्डिंग लावतात, परंतु रविवारच्या स्थितीप्रमाणे 11 मेपर्यंतच्या कोकणातील सर्व गाडय़ांची तिकिटे फुल्ल झाली असल्याचे चित्र आहे. प्रवासी आरक्षण केंद्रांवर सकाळी 8 वाजता काऊंटर उघडताच अवघ्या काही मिनिटांत तिकिटे संपली जाऊन भलीमोठी प्रतीक्षा यादीच हाती पडत आहे. त्यामुळे जादा गाडय़ा सोडण्याची मागणी होत आहे.