कोकण रेल्वेच्या कामगारांना तातडीने दिवाळी बोनस मिळणार

582

रेल्वे संचालकांचे रेल कामगार सेनेला आश्वासन

दिवाळी उलटून गेली तरीही कोकण रेल्वेच्या कामगारांना बोनस मिळालेला नाही. या कामगारांना 15 हजार रुपये बोनस देण्याचे जाहीर करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर आज गुरुवारी रेल कामगार सेनेचे अध्यक्ष आनंदराव अडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली  कोकण रेल्वे कर्मचाऱयांनी कोकण रेल्वे संचालक संजय गुप्ता यांच्या बेलापूर येथील कार्यालयावर धडक दिली. शिवसेनेच्या दणक्याने रेल्वे प्रशासन खडबडून जागे झाले आणि कोकण रेल्वेच्या कामगारांना तातडीने दिवाळी बोनस देण्यात येईल असे आश्वासन रेल कामगार सेनेला दिले.

रेल कामगार सेना आणि कोकण रेल्वे कर्मचारी युनियन यांच्या संयुक्त विद्यमाने कोकण रेल्वेच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. दसरा आणि दिवाळी उलटून गेल्यावरही कोकण रेल्वेने कामगारांना दरवर्षीप्रमाणे बोनस दिला नव्हता. याबाबत कामगारांच्या मनात प्रचंड असंतोष खदखदत होता. त्यामुळे रेल कामगार सेनेचे सरचिटणीस दिवाकर देव यांच्या वतीने कोकण रेल्वे प्रशासनासोबत दिवाळीपूर्वी पत्रव्यवहारही करण्यात आला होता, परंतु रेल्वे प्रशासनाने कर्मचाऱयांना बोनस देण्यास टाळाटाळ केल्यामुळे रेल कामगार सेना आणि दिवाकर देव तसेच सुभाष म्हाळगी यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य मोर्चा काढण्यात आला. या आंदोलनामुळे हादरलेल्या कोकण रेल्वे प्रशासनाने रेल्वे कामगारांना तातडीने दिवाळी बोनस देण्याचे आश्वासन दिले. त्याबद्दल रेल कामगार सेना आणि कोकण रेल्वे कर्मचारी युनियन यांच्या वतीने कोकण रेल्वेचे संचालक संजय गुप्ता आणि ठाकूर यांचे जाहीर आभार मानन्यात आले.

यावेळी रेल कामगार सेनेचे कार्याध्यक्ष संजय जोशी, रेल कामगार सेनेचे खजिनदार नरेंद्र शिंदे, सहकार्याध्यक्ष राजेंद्र पाटोळे, जनार्दन देशपांडे, वाय. पी. जाधव, सुरेश परदेशी, स्वप्नील झेमसे, राजू पवार तसेच मुंबई विभागीय अध्यक्ष नरेश बुरघाटे, आशुतोष शुक्ला, चंद्रकांत विनरकर, मनोज निकम, योगेश भोईर, विजय आव्हाड तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते. कोकण रेल्वे कामगार सेनेचे तसेच कोकण रेल्वे कर्मचारी युनियनच्या भावना मॅथ्यू, राजू सुरती, विलास खेडेकर आणि इतर पदाधिकाऱयांनी या मोर्चाचे आयोजन केले होते.

 

आपली प्रतिक्रिया द्या